*राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरवरील झाडांची दुरावस्था; पीडब्ल्यूडीच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाला लाखोंचा चुना*
खामगांव /(संतोष आटोळे)
खामगाव शहरातील सजनपुरी बाय पास ते एमआयडीसी परिसरापर्यंत सहा नंबर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या झाडांची आज अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या या झाडांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.
महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण व हरितीकरणासाठी काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, योग्य संगोपन, नियमित पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन व देखभाल न झाल्यामुळे अनेक झाडे वाळून गेली असून काही झाडे तुटून पडलेली आहेत. काही ठिकाणी झाडे वाढलेली दिसत असली तरी बहुतांश ठिकाणी झाडांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
वृक्षप्रेमींच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्यात वाळलेली झाडे काढून टाकण्यात आली आणि त्या जागी नवीन झाडे लावण्यात आली. मात्र नवीन झाडांचीदेखील योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्यामुळे तीही सुकण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी कधीच येत नसल्याने कंत्राटदार आणि यंत्रणेकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप होत आहे.

“शासन पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मात्र काही कामचुकार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा निधी वाया जात आहे. झाडे लावून केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जातात, पण प्रत्यक्षात संगोपनाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे,” असा संतप्त सवाल वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच झाडांच्या संगोपनासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व वृक्षप्रेमींमधून जोर धरू लागली आहे.