📍 नाडे : ०२ एप्रिल २०२६
मरळी (ता. पाटण) येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सव हा डोंगरी भागातील नागरिकांना विविध ठिकाणच्या संस्कृती, कला आणि पर्यटनाचा अनुभव देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांनी केले.
पाटण तालुक्यातील नाडे येथे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पंचायत समिती सभापती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवीराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून डोंगरी भागातील नागरिकांना पर्यटनासोबतच राज्यातील विविध भागातील खाद्यसंस्कृती, कला आणि परंपरांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या स्टॉल्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महोत्सवात पर्यटक आणि नागरिकांसाठी बोटिंग, पॅराग्लायडिंग, संगीत कारंजे, लेझर शो, घोडा व उंट सफारी यांसारख्या आकर्षक उपक्रमांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना एक वेगळा पर्यटन अनुभव घेता येणार आहे.
२ ते ६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवामध्ये शस्त्र प्रदर्शन, लावणी महोत्सव, पोवाडा सादरीकरण, मर्दानी खेळ, भजन-कीर्तन, ब्रास बँड पथक तसेच हिंदी व मराठी संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांनी केले.
तसेच महोत्सवाच्या कालावधीत सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा नाडे येथील विद्यार्थ्यांनी शौर्य गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. तसेच कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments