थॅलेसमियाग्रस्त चिमुकलीसाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा - सुरज बोरसे
उद्या शेगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
शेगाव : थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या चिमुकली कु. निष्ठा राहुल पांडे हिच्या मदतीसाठी मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सकाळी 10 वाजता राजेश्वर कॉलनी, राजेश्वर मंदिर परिसर, आळसना रोड, शेगाव येथे पार पडणार असून या शिबिरात रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा व रक्तदान करून रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन मेरा युवा भारतचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी केले.
थॅलेसेमिया या आजारामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते. कु. निष्ठा ही जन्मापासून या आजाराशी धैर्याने सामना करत असून तिच्या उपचारांसाठी सातत्याने रक्ताची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील नागरिकांनी एकत्र येत तिच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज मार्तडराव बोरसे यांनी सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. कु. निष्ठासारख्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज असते, त्यामुळे युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदवावा.”
शेगाव शहर व तालुक्यातील युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदानामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, उलट आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते, याची जाणीव ठेवून अधिकाधिक लोकांनी पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले. या शिबिरामुळे कु. निष्ठाला आवश्यक असलेले रक्त मिळून तिच्या उपचारांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सुरज बोरसे यांनी केले तसेच इच्छुक रक्तदात्यानी 8308543759, 86690 53404 या क्रमांकावर सपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments