Advertisement

ज्ञानगंगा अभयारण्यात ‘धुरंदर’ नर वाघाचे यशस्वी पुनर्वसन..

ज्ञानगंगा अभयारण्यात ‘धुरंदर’ नर वाघाचे यशस्वी पुनर्वसन..!

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत ज्ञानगंगा अभयारण्यात पीकेटी–०७–सीपी–०१ (धुरंदर) या नर पट्टेदार वाघाचे यशस्वी पुनर्वसन केले. महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या प्रधान सचिवांशी सविस्तर चर्चा करून पांढरकवडा (यवतमाळ) येथून या वाघाला बुलढाण्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

वाघासाठी सुरक्षित व नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी बोथा जंगलातील देव्हारी गावाचे संपूर्ण पुनर्वसन केले. यासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. परिणामी या भागातील मानवी हस्तक्षेप पूर्णतः थांबवून भविष्यात संरक्षित वाघ अधिवास म्हणून हा परिसर विकसित केला जाणार आहे.

हा नर वाघ अवघ्या सहा महिन्यांचा असताना आईपासून विभक्त झाल्यानंतर पेंच अभयारण्यात संगोपनाखाली वाढला. नैसर्गिक अधिवासात स्वतंत्रपणे जगण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्ये आत्मसात केल्यानंतर त्याचे ज्ञानगंगा अभयारण्यात पुनर्वसन करण्यात आले. प्रारंभी पाच हेक्टरच्या संरक्षित क्षेत्रात सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवून वनविभागामार्फत नियमित गस्त वाढवण्यात आली होती. देव्हारी गावाच्या संपूर्ण पुनर्वसनामुळे आता वाघासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.

आज नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड तसेच मी स्वतः वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत संरक्षित अधिवासाची पाहणी करून वाघाच्या हालचाली, आरोग्य व सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

या भेटीदरम्यान नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड, नगरपालिकेचे गटनेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, तारापूरचे सरपंच प्रवीण जाधव, निषाद येरमुले, मंगेश बिडवे, ज्ञानेश्वर खांडवे, वनविभागाचे अधिकारी राठोड साहेब, काळे साहेब, दीपेश लोखंडे, प्रकाश सावळे, श्रीकृष्ण बोबडे, फॉरेस्ट गार्ड श्रीधर अंभोरे यांच्यासह वनरक्षक उपस्थित होते. परिसराची सविस्तर माहिती फॉरेस्ट गार्ड श्री. श्रीधरभाऊ अंभोरे यांनी दिली.

या उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यात पर्यावरण संतुलन राखत मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दिशेने एक सक्षम आणि शाश्वत मॉडेल उभे राहिले आहे.


Post a Comment

0 Comments