सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांनी लेखणी झिजवावी
खामगाव, ता.७ ः पत्रकारिता केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही तर समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. खामगावची पत्रकारिता ही नेहमीच सकारात्मक राहिली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य या ठिकाणी होताना दिसते. पत्रकारांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपली लेखणी झिजवावी, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी केले.
खामगाव प्रेस क्लब, खामगावच्या वतीने ता. ६ जानेवारी रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे पत्रकार दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, तहसीलदार सुनिल पाटील, जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे, चंद्रकांत रेठेकर, ॲड.अमोल अंधारे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर, आद्य महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार राजेश राजोरे यांनी केले. दरम्यान मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांचे हस्ते खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणारा मानाचा खामगाव रत्न पुरस्कार सर्प मित्र तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात व दुर्देवी दुर्घटनेत मदतीसाठी सक्रीय सहभाग नोंदविणारे संजय खंडेराव यांना तर क्रीडा व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर श्री. हनुमान व्यायाम मंडळाला खामगाव गौरव व स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार अनिल खोडके आणि युवा पत्रकारीता प्रेरणा पुरस्कार सुरज बोराखडे यांना देवून गौरविण्यात आले. सोबतच विदर्भ विभागातून पत्रकारिता क्षेत्रात प्रथम पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. राजेश राजोरे व नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक सतीषआप्पा दुडे, तहसीन शाह आणि पत्रकार श्रीकांत भुसारी यांच्या सुविद्य पत्नी सौ.ज्योती भुसारी यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन खामगाव प्रेस क्लबचे सचिव अनिल गवई व आभार प्रदर्शन अध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांनी केले. यावेळी शहरातील पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक, राजकारणी व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
-
0 Comments