Advertisement

लाडकी बहीण योजनेतील अपात्र अन्यायाविरोधात ओबीसी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचा एल्गार !*खामगाव/(संतोष आटोळे)*

लाडकी बहीण योजनेतील अपात्र अन्यायाविरोधात ओबीसी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचा एल्गार !
*खामगाव/(संतोष आटोळे)*              राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे खामगाव शहरातील अनेक पात्र महिलांचे अनुदान अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे शेतमजूर व हातमजूर महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दि. ११ जानेवारी २०२६ रोजी खामगाव येथे लाडकी बहीण योजना मार्गदर्शन कॅम्प ओबीसी महासंघातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पदरम्यान अनेक महिलांची ई-केवायसी करताना चुकीची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. काही महिलांनी मोबाईलद्वारे ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला असता, तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा थेट योजनेतील लाभ बंद झाल्याचे स्पष्ट झाले.विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट तसेच नारीशक्ती अ‍ॅपवर सध्या ई-केवायसी प्रक्रिया बंद असल्याने पुनश्च केवायसी करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. परिणामी, पूर्णतः पात्र असूनही अनेक गरीब व मजूर महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये तर मजूर महिलांना सरकारी कर्मचारी असल्याचे सिस्टीमवर दर्शविले जात असून, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.या सर्व महिलांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपण योजनेस पात्र असल्याचे नमूद केले असून, त्यांची सविस्तर यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे.

 भविष्यात यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास महिलांमध्ये शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होऊ शकतो .दरम्यान,या अन्यायाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश जगन्नाथ चौकसे व युवा जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी खामगाव येथून बुलडाणाकडे मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिजामाता प्रेक्षागार मैदानापासून निघालेल्या या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही केवळ तांत्रिक कारणांमुळे आम्हाला हप्ता मिळत नाही. आमच्या कष्टाचे योग्य मोल शासनाने द्यावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका सहभागी महिलेने व्यक्त केली.या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून वरिष्ठ स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करावा, अपात्र ठरविण्यात आलेल्या पात्र महिलांची पुनश्च ई-केवायसी करून थकीत तसेच पुढील हप्ते त्वरित सुरू करावेत, अशी ठाम मागणी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे व ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.यावेळी सावळे , राहुल सावळे , अनंता जाधव , संदीप सावळे , सुरज बेलोकार  , दीपक महाजन , प्रकाश घाडगे  , मेजर सुभाष फेरंग , शेख हुसेन , प्रमोद जावडेकर यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते .
......अन एका तासातच प्रशासन हलले...... राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहरातून हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन या गंभीर विषयाची चर्चा झाली . चर्चा झाल्यानंतर लगेच एका तासातच महिला व बालकल्याण विभागाचे विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री डिगोळे साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलाविण्यात आले व अपात्र लाडक्या बहिणी विषयी चर्चा करून लवकरच शासन स्तरावर या गंभीर विषयाचा तोडगा काढावा अशी सूचना देण्यात आली . 

....... महिला व बालकल्याण विभागामार्फत आवाहन..... महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री डिगोळे साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या आहेत त्यांना पुढील शासनाचा ई केवायसी मध्ये बदल होण्याचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींनी कोणत्याही तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर कोणत्या कार्यालयामध्ये चकरा मारू नये व आपला पैसा व वेळ वाया घालवू नये असे आवाहन केले .

....... संवेदनशील खामगाव शहराचे नाव लाडक्या बहिणींनी बुलढाण्यात केले रोशन........ खामगाव शहराचे नाव बुलढाणा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळख आहे . परंतु आज खामगाव शहरातील हजारो महिलांनी अतिशय शिस्तप्रिय व शांततेमध्ये मोर्चा व निवेदन देत संवेदनशील असलेल्या खामगावचे नाव रोशन केले . यावेळी मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना किंवा मोर्चाला गालबोट लागले नाही . बुलढाणा शहरातील नागरिकांनी खामगांव शहरातील लाडक्या बहिणींच्या या शांतप्रिय व शिस्तीचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवीकुमार राठोड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

Post a Comment

0 Comments