Advertisement

आंबाबारवा अभयारण्यात वन्यजीवांची भरभराट; ९ वाघांसह ६९० प्राण्यांची नोंद…सौ गीता सोनोने

आंबाबारवा अभयारण्यात वन्यजीवांची भरभराट; ९ वाघांसह ६९० प्राण्यांची नोंद…सौ गीता सोनोने
सातपुड्याच्या निसर्गसंपन्न पायथ्याशी वसलेल्या आंबाबारवा अभयारण्यात यंदा बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर “निसर्ग अनुभव २०२६” हा उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनजीव परिक्षेत्र कार्यालय सोनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ मे ते २ मे २०२६ या कालावधीत ही विशेष प्राणी गणना मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात अभयारण्यात कार्यरत ३२ बीटमधील एकूण ५५ कर्मचारी तसेच १२ निसर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला. वनविभागाच्या नियोजनबद्ध धोरणामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. प्राणी गणनेसाठी अभयारण्यातील विविध पाणवठ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. चिमणरोखा, गोल पानवठा, चिचपाणी, नर्सरी पानवठा, गरम पाणी, सिमेंट पानवठा, पिंपळद मंदिर परिसर, कॅम्पजवळील पाणवठा, काळी माती, मिडोज मचान, आसरा कुंड, आडनाला, बोरमाळा, चोर पानवठा, गरम पाणी दर्गा, चिच खाडी, नीलकुंड, बेहडा, गुमान पाणवठा, चांभारवाडी, सुकलाल पानवठा, गुंमठी मंदिर, बारेला, चाफरानाला, धरण पाणवठा, गरपाणी रस्ता, गोल पानवठा क्रमांक २ आदी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण करून माहिती नोंदविण्यात आली.
यंदाच्या प्राणी गणनेत अभयारण्यातील जैवविविधतेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेष म्हणजे वाघांची संख्या ९ इतकी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ४ पिल्ले आढळल्याने वन्यजीव संवर्धनासाठी हा अत्यंत सकारात्मक संकेत मानला जात आहे. त्याचबरोबर बिबट ३, अस्वल १७, नीलगाय ५१, सांबर ८७, गवा ४६, रानडुक्कर ७९, माकड २०८, मोर ९०, ससा २०, रान कुत्रा १०, रान मांजर ८, भेडको २० तसेच इतर प्रजातींसह एकूण ६९० प्राण्यांचे दर्शन झाले.
ही प्राणी गणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, अभयारण्यात वाढणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा व नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनाचा ठोस पुरावा आहे. वनविभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जंगलातील पाणवठ्यांचे संवर्धन, अन्नसाखळीचे संतुलन आणि वन्यजीवांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यश मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
“निसर्ग अनुभव २०२६” या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी निसर्गप्रेमींना वन्यजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली आहे. विशेषतः युवकांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जाणीव निर्माण होऊन निसर्गाशी नाते अधिक दृढ करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

वनपरिक्षेत्र कार्यालय सोनाळा यांच्याकडून अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंबाबारवा अभयारण्यातील समृद्ध जैवविविधता आणि वाढती प्राणीसंख्या ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असून, वन्यजीव संवर्धनासाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments