*बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचा धक्कादायक कारभार! 30 मार्च 2026 च्या माहिती अधिकार अपील अर्जावर 23 एप्रिललाच सुनावणीचे आदेश — नागरिकांच्या हक्कांशी उघड खेळ?”*
बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपील प्रकरणात तारखांचा धक्कादायक गोंधळ उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे केवळ प्रशासनाची निष्काळजी वृत्तीच नव्हे, तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी थेट खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
माहितीनुसार, माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते रुपेश कलंत्री यांनी दिनांक 30 मार्च 2026 रोजी माहिती अधिकार अंतर्गत तीन अपील अर्ज दाखल केले होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील अपिलीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पत्रामध्ये या अर्जांसंदर्भात चुकीची दिनांक 30 एप्रिल 2026 नमूद करत, त्याची सुनावणी 23 एप्रिल 2026 रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतो
अर्जाची तारीखच पुढील महिन्यात दाखवली असताना, त्यापूर्वीच सुनावणी कशी?
हा केवळ कागदोपत्री गोंधळ आहे की जाणीवपूर्वक अपील प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न?
या प्रकरणामुळे माहिती अधिकार कायद्याचा सरळ सरळ खेळखंडोबा होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांनी पारदर्शकतेसाठी वापरायचा हा कायदा, त्याच प्रशासनाकडून दुर्लक्षित केला जात असल्याची भावना अधिकच तीव्र झाली आहे.
रुपेश कलंत्री यांनी या प्रकारामुळे झालेला मानसिक मनस्ताप व्यक्त करत, संबंधित अपिलीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
“डोळेझाक करून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा राहिलेली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांमार्फत केली आहे. अन्यथा, या विरोधात व्यापक पातळीवर आवाज उठवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments