*निवृत्त सफाई कामगाराच्या मुलाची नियुक्ती रखडली; जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा*
खामगाव/(संतोष आटोळे ) सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त सफाई कामगार चंद्रकुमार छगन आठवले (रा. सतीफैल, रेखा प्लॉट, खामगाव) यांनी आपल्या मुलाची नियुक्ती अद्याप न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
चंद्रकुमार आठवले हे सुमारे सहा वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा लकी चंद्रकुमार आठवले याची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस लाड-पागे समितीमार्फत करण्यात आली होती. मात्र, समितीची शिफारस असूनही आजपर्यंत नियुक्ती झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आठवले कुटुंब आर्थिक व मानसिक त्रास सहन करत असल्याचे त्यांनी सांगितले. न्याय मिळावा आणि मुलाची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय बुलडाणा यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
या इशाऱ्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
0 Comments