Advertisement

डिजिटल पाऊल, प्रगतीचे* *देऊळ : २०२७ ची पहिली* *ऑनलाईन जनगणना*

*डिजिटल पाऊल, प्रगतीचे* *देऊळ : २०२७ ची पहिली* *ऑनलाईन जनगणना* 
 खामगाव, दि.२३(उमाका): भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘जनगणना 2027’ ही देशातील पहिली पूर्णतः डिजिटल व हायटेक जनगणना ठरणार असून, तिचा पहिला टप्पा एप्रिल-मे 2026 पासून सुरू होणार आहे. या जनगणनेमध्ये अत्याधुनिक ‘जिओ-रेफरन्सिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक घराची अचूक नोंद डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतेही घर वंचित राहणार नाही तसेच पुनर्गणना होण्याची शक्यता टाळली जाईल.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा ‘हाऊस लिस्टिंग’ (House Listing) म्हणून ओळखला जाईल, जो महाराष्ट्रात १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यापूर्वी नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची ‘Self-Enumeration’ सुविधा १ मे २०२६ पासून उपलब्ध होणार असून, ही विंडो साधारण १५ दिवसांसाठी खुली राहील. दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.

या प्रक्रियेसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in⁠� वर जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी करताना कुटुंबप्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांक आवश्यक असून, एका मोबाईल क्रमांकावरून एकाच घराची नोंद करता येईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ‘SE ID’ प्रदान करण्यात येईल, जो पुढील पडताळणी प्रक्रियेसाठी आवश्यक असेल.
Self-Enumeration करताना नागरिकांनी १६ भाषांपैकी एक भाषा निवडून OTP द्वारे पडताळणी करणे, घराचा अचूक पत्ता नकाशावर चिन्हांकित करणे तसेच हाऊस लिस्टिंगशी संबंधित ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. अंतिम सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
जनगणना अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी केली जाईल. या वेळी नागरिकांनी SE ID सादर केल्यास माहितीची पडताळणी सुलभ होईल.
महत्त्वाचे म्हणजे, या जनगणनेदरम्यान नागरिकांकडून उत्पन्न, बँक तपशील किंवा कोणतीही वैयक्तिक कागदपत्रे मागवली जाणार नाहीत. तसेच डेटा सुरक्षिततेसाठी उच्चस्तरीय उपाययोजना करण्यात आल्या असून, जनगणना माहिती ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या माहिती संरचने’च्या सुरक्षेखाली ठेवण्यात येणार आहे. केवळ अधिकृत अधिकारीच बायोमेट्रिक व डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून हा डेटा पाहू शकतील. डेटा लीक केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत या प्रक्रियेस कायदेशीर बळ देण्यात आले असून, कामात अडथळा आणणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
तहसीलदार खामगाव श्री. सुनिल पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, १ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या Self-Enumeration प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच जनगणना अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून जनगणना १०० टक्के यशस्वी होईल.

Post a Comment

0 Comments