Advertisement

बुलढाणा जिल्ह्याला १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१ उपकेंद्रांची भेट;* *आरोग्य यंत्रणेने सकारात्मक भावनेतून जनसेवा करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव*

*बुलढाणा जिल्ह्याला १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांची भेट;*
 *आरोग्य यंत्रणेने सकारात्मक भावनेतून जनसेवा करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव*

*बुलढाणा, दि. 22 (जिमाका) :* केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्ह्यात लवकरच १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५१ नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येतील. आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती पुण्याचं काम म्हणून सकारात्मक भावनेतून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक डॉ. सुशिल वाकचौरे, सहसंचालक पीपीटी डॉ.प्रसाद भंडारी, सहसंचालक डॉ. बाळासाहेब सोणवने, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत, सहसंचालक पुणे डॉ. राजरत्न वाघमारे, अति.संचालक मुंबई डॉ. किरणकुमार वाघमारे,उपसंचालक मुंबई डॉ. सुहास मोनाळकर, आयुष सहसंचालक मुंबई डॉ. विलास सरोदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार आदी उपस्थित होते.
 

या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला. सध्या जिल्ह्यात १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १ जिल्हा रुग्णालय, १ जिल्हा स्त्री रुग्णालय, १ जिल्हा क्षयरोग रुग्णालय, ३ सामान्य व उपजिल्हा रुग्णालये, १४ ग्रामीण रुग्णालये, ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८२ उपकेंद्रे, १० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ४० नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत आहेत. जिल्ह्याचा जन्मदर १३.९२ असून बालमृत्यू दर ८.०९ व माता मृत्यू दर २३ इतका कमी राखण्यात जिल्ह्याला यश आले आहे.

आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत बोलताना मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. ही उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांची दिवसातून दोन वेळा बायोमेट्रिक हजेरी घेण्यात यावी. आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ असले तरी रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ पावले उचलावीत. जिल्ह्याला आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी आपण स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील पोलीस स्टेशन असलेल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर शवविच्छेदनाची सुविधा असणे आवश्यक असून, यासाठी प्रलंबित असलेली सर्व बांधकामे तात्काळ पूर्ण करून स्वतंत्र रूम्स कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही, फायर ऑडिट आणि गॅस ऑडिटची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या जिल्ह्यात ८ डायलेसिस सेंटर्स आहेत, मात्र भविष्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डायलेसिस सेंटर आणि ब्लड बँक असणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी यंत्रणेला तसे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना आणि शाळकरी मुलांना मोफत चष्मे वाटप करण्याचे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. कोव्हिड काळात मिळालेले अतिरिक्त मेडिकल साहित्य, विशेषतः बेड्स आणि ऑक्सिजन टँक अद्याप अनेक ठिकाणी वापराविना पडून आहेत. काही रुग्णालयांत रुग्ण जमिनीवर उपचार घेत असल्याचे निदर्शनास आल्याने, या अतिरिक्त साहित्याचे योग्य नियोजन करून ते तात्काळ गरजू रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.

मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी या विभागाने जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करून त्यांना स्वस्थ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. जिल्ह्याला टीबी मुक्त करण्यासाठी १८०० रुग्णांपैकी अद्याप केवळ ९०५ रुग्ण दत्तक घेण्यात आले आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः 'निक्षय मित्र' बनून रुग्ण दत्तक घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना त्यांनी एचपीव्ही वॅक्सिनबाबत होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी व्यापक जनजागृती करावी आणि ही मोफत लस शिबिरांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवावी, असे सांगितले.

कर्करोग निदानाबाबत बोलताना मंत्री महोदयांनी हायपर टेन्शन, डायबिटीस, ओरल, ब्रेस्ट आणि सर्वाइकल कॅन्सरच्या स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवून ते १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट दिले. ३० वर्षांवरील प्रत्येक महिलेची ब्रेस्ट आणि सर्वाइकल कॅन्सरसाठी तपासणी करण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून मोहिमा राबवाव्यात. तसेच आयुष्मान भारत हेल्थ कार्ड ही शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून, १५ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्ह्यात ९ लाख ८२ हजार २०१ कार्डे मंजूर झाली असली तरी, अजूनही शेवटच्या गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामीण भागातील काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध असावीत आणि प्रत्येक रुग्णाला स्वस्त 'जन औषधी' दुकानातून औषधे मिळावीत हे सुनिश्चित करावे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना किंवा इतर रुग्णांना विनाकारण बाहेर रेफर न करता शासकीय दवाखान्यातच उपचार करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी बजावले.

या बैठकीत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानांकन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर कामात कुचराई करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वाढ थांबविण्याचे निर्देशही यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, बुलढाणा जिल्हा आरोग्याच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असून गेल्या वर्षभरात जिल्ह्याला दोन पुरस्कार मिळाले आहेत. 'माझा गाव आरोग्य संपन्न' या मोहिमेसाठीही जिल्ह्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments