Advertisement

जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज.. सौ गीता सोनोने

जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज.. सौ गीता सोनोने

सुमारे 370 वर्षांपासूनची असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. यावेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. भेंडवळच्या घटमांडणीतून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असतात 

यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष


पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.

कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.

ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.

देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल 

राजा कायम असेल...

देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.

पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल...अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.

*काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?*

पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. 


घटमांडणी नेमकी कशी करतात?

भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.

शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का?

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

Post a Comment

0 Comments