*घाटपुरी येथील सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था*
*लाखोंचा निधी गेला कुठे*
घाटपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय आज पूर्णतः दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शौचालयाची नियमित स्वच्छता, देखभाल व पाणीपुरवठा नसल्यामुळे ही इमारत वापराअभावी ओस पडली असून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. शौचालय परिसरात झाडाझुडपे वाढली असून दरवाजे, आतील सुविधा व स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशालाच हरताळ फासणारी ही परिस्थिती असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक सुविधेकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच शौचालय तातडीने सुरू करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधांची अशी अवस्था असेल तर शासनाच्या निधीचा नेमका उपयोग कुठे होतोय? असा संतप्त सवाल घाटपुरी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आता संबंधित वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments