*खामगावात गुंजकर एज्युकेशन हब आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने भव्य करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात*
*विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तज्ज्ञांकडून विविध क्षेत्रांतील संधींवर सखोल मार्गदर्शन*
खामगाव/(संतोष आटोळे ) विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात कशा प्रकारे यश संपादन करावे, तसेच पालकांनी या प्रवासात कोणती भूमिका बजावावी, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खामगाव शहरात पहिल्यांदाच भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 'गुंजकर एज्युकेशन हब, खामगाव' आणि 'डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ मे रोजी आयोजित या मेळाव्याला खामगाव शहर व परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
तब्बल तीन तास चाललेल्या या अभ्यासपूर्ण कार्यक्रमात डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे मुख्य वक्ते डॉ. पुष्कराज वरपे आणि डॉ. घनश्याम सरोदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक कोर्सेस याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली. गुंजकर एज्युकेशन हब व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक उदाहरणे देत मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,
"कोणत्याही उच्च शैक्षणिक कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर पुढील चार वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार देणारी असतात. या काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, अभ्यासाचे नियोजन आणि पालकांनी मुलांना द्यायचा मानसिक पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रसंगी खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजाननजी गायकवाड यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पुणे येथील नामांकित 'डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी'चे तज्ज्ञ मार्गदर्शक खामगाव सारख्या शहरात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत, ही स्थानिक विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत भूषणावह आणि आनंदाची बाब असल्याचे विचार त्यांनी मांडले. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोरजी तावडे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअर निवडीसाठी महत्त्वपूर्ण कानमंत्र दिला. या भव्य मेळाव्याला डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे प्रा. पंकज परदेशी, प्रा. नितीन शिंदे, तसेच गुंजकर एज्युकेशन हबच्या सचिवा सुरेखा गुंजकर, गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले आणि जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सचे मुख्याध्यापक रवींद्रजी मांडवेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय खामगाव शहरातील अनेक गणमान्य नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
हा कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा ठरला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments