*दलित समाज व सफाई कामगारांवरील अन्यायाविरोधात १ जूनला धरणे आंदोलन*
खामगाव/(संतोष आटोळे ) खामगाव शहरातील दलित समाजातील मेहतर समाज व सफाई कामगार वर्गावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांच्या निषेधार्थ तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व न्याय मिळावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
मेहतर समाजातील सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांना विविध स्तरांवर अन्याय सहन करावा लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सफाई कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषद, कंत्राटदार तसेच संबंधित विभागांकडून सफाई कामगारांवर होणाऱ्या कथित अन्यायाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासोबतच सफाई कामगारांच्या सुरक्षेची हमी, त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या धरणे आंदोलनात मेहतर समाज सकल पंच मंडळ, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, रमेश्वर ग्रुप खामगाव, उपेक्षित दलित सामाजिक परिषद, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, वाल्मिकी समाज सुधार समिती, वाल्मिकी चौक भवानी नवरंग उत्सव मंडळ, नवचेतन क्रिडा मंडळ, जय गजानन मित्र मंडळ, सुदर्शन नवयुवक मंडळ आदी संघटना व सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संजय राजू तंबोले व विक्की कालिदास सारवान यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री, कामगार मंत्री, अनुसूचित जाती आयोग, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस स्टेशन तसेच नगर परिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
“सफाई कामगारांना न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
0 Comments