*पळसोदचा के.टी. बंधारा ठरतोय जलक्रांतीचे वरदान*
*कडक उन्हाळ्यातही परिसरातील विहिरींना मिळाला जीवदान*शेतकऱ्यांमध्ये समाधान*
अकोट : अकोला जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत अकोट तालुक्यातील मौजे पळसोद येथील ‘कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा’ अर्थात के.टी. वेअर हा परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
जलसंधारण विभागाने दूरदृष्टी ठेवून उभारलेला हा बंधारा आज परिसरातील जलपातळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उन्हाळ्याच्या कडक झळांमध्येही बंधाऱ्यात पाणीसाठा कायम असल्याने परिसरातील विहिरींना पाणी उपलब्ध होत असून शेतकरी, नागरिक आणि जनावरांची तहान भागत आहे.
या बंधाऱ्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींना नवसंजीवनी मिळाली आहे. परिणामी उन्हाळी पिकांना आधार मिळत असून पशुधनासाठीही पाण्याची सोय झाली आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी ज्या भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, त्या भागात आज हिरवाई टिकून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाच्या कामाचे कौतुक करत हा बंधारा “विदर्भाच्या मातीसाठी वरदान” असल्याची भावना व्यक्त केली. जलसंधारणाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, याचे पळसोद येथील के.टी. बंधारा हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
0 Comments