*बुलढाणा दि.26 (जिमाका):* शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि शेतकरी गटांच्या आर्थिक व तांत्रिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेली “शेतमाल प्रक्रिया उद्योग आधारित कार्यशाळा” सोमवार दि. २५ मे रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत परिसरातील शेकडो प्रगतशील शेतकरी, शेतकरी गटांचे प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यशाळेमध्ये Rupaya Farmer Producer Company चे संचालक आदित्य शहा यांनी लाल मिरची, हळद, अद्रक, तूर, मका आणि केळी यांच्या खरेदी-विक्री करार प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि करार शेतीचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
प्रसिद्ध सीए वासुदेव कोठारी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यपद्धती, आर्थिक नियोजन, कायदेशीर बाबी तसेच वेळोवेळी पूर्ण करावयाच्या वित्तीय प्रक्रियांबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी Doctor Moriga Pvt. Ltd. चे संचालक विजय सिंग आणि कामिनी सिंग यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेत शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबरोबरच शेवगा पावडर निर्मिती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली.
जिल्ह्यात वाढत असलेल्या फळपिकांच्या क्षेत्राचा विचार करता Abhalmaya Farmer Producer Company चे संचालक राजीव जावळे यांनी फळ प्रक्रिया उद्योगातील भविष्यातील संधी, मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांचे विश्लेषण केले. पोकरा प्रकल्पाच्या नोडल अधिकारी रेणुका पाटील यांनी ना.दै.कृ.सं. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच वंदना टेकाळे यांनी भाजीपाला व औषधी वनस्पती साठवण आणि प्रक्रिया करण्यासाठी ‘सोलार ड्रायर’च्या उपयुक्ततेवर मार्गदर्शन केले.
Vidarbha Samruddhi Farmer Producer Company चे संचालक संतोष साखरे यांनी आपल्या कंपनीची यशोगाथा आणि हळद प्रक्रिया उद्योगातील अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडत प्रक्रिया उद्योगामुळे उत्पन्नवाढ कशी साध्य झाली हे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) बुलढाणा संतोषजी डाबरे होते. यावेळी प्रकल्प उपसंचालक आत्मा दिपक बुटे, कृषी उपसंचालक संजीवनी कणखर तसेच आत्मा विभागाचे गजानन चौधरी, भरत कापसे, गजानन इंगळे आणि अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास खडसान यांनी तर आभार प्रदर्शन दिपक बुटे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात संतोषजी डाबरे यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक प्रक्रिया उद्योग स्वीकारण्याचे आवाहन करत, मूल्यवर्धित उत्पादनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन केले.
0000
0 Comments