नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा शिवारातील शेतकऱ्याची तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार नांदुरा, ता. २९: तालुक्यावर यंदा निसर्गाची अवकृपा तर आहे परंतू, इतरही संकटे पाठ सोडायला तयार नसून, रोज नवनवीन संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये आता गव्हाचे बियाणे बोगस निघाले म्हणून शेतकऱ्यांने चक्क शेतात मेंढा चराईसाठी सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
यावर्षी निसर्गासोबतच बियाणे कंपन्यांच्या वक्रदृष्टीतून बळीराजा पूरता हवालदिल झाला असून, सर्वच पिकातून लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.ज्यांचे स्वतःचे शेत आहेत त्यांची ही परिस्थिती असताना ठोक्या बटाईची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तर घरून पैसे भरून नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच पोटळी येथील शेतकऱ्यांचे शेतात रब्बी हंगामात लावलेल्या गव्हाची कोणतीही वाढ न होता, कमी दिवसातच ओंब्या लागल्याने उत्पन्नाची कोणतीही हमी न राहिल्याने विठ्ठल लाहुडकर या शेतकऱ्याने चक्क उभ्या पिकात मेंढ्या चारल्या आहेत. त्याबाबत या शेतकऱ्याने गव्हाचे बियाणे बोगस निघाल्याची तक्रार तहसीलदार व कृषी विभागाकडे करून झालेल्या नुकसानीची मदत देण्याची मागणी केली आहे. पोटळी येथील विठ्ठल महादेव लाहूडकर या शेतकऱ्याने तिकोडी शिवारात देविदास जगन्नाथ कळस्कार यांच्या शेत गट नं ६८ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी ०.६० हेक्टर क्षेत्रात अजित कंपनीचे अजित १०२ हे गव्हाचे वाण ठोक्या बटाईतून पेरले होते. हे पीक एक महिन्याचे झाले असता एक महिन्याच्या कालावधीतच त्या पिकाला ऑव्या लागल्या असून ते बियाणे खराब निघाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यातून कोणत्याही उत्पन्नाची हमी नसल्याने विठ्ठल लाहुडकर या शेतकऱ्याने चक्क या शेतात मेंढ्या चराईसाईसाठी सोडल्या आहेत. मेंढ्या घालण्या अगोदर या शेतकऱ्याने २७ डिसेंबरला तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
*शेतकरी - विठ्ठल महादेव लाहूडकर यांची प्रतिक्रिया...*
मी पोटळी येथील शेतकरी असून ठोक्या बटाईने मी दीड एकर क्षेत्रात
गहू पिकासाठी अजित १०२ या वाणाची पेरणी २५ नोव्हेंबरला केली असता एका महिन्यानंतर या पिकाची अपेक्षित वाढ न होता, त्याला कमी कालावधीत ओंब्या लागल्या आहेत. या शेतासाठी मी मशागत व पेरणीसाठी आतापर्यंत २० ते २५ हजार रुपये खर्च केला आहे. परंतु हे बियाणे बोगस निघाल्याने माझे खूप नुकसान झाले आहे. कंपनीचे प्रतिनिधी यांनी शेताची पाहणी करून उडवाउडवीची उत्तरे दिली. या शेतात उत्पन्नाची कोणतीच हमी नसल्याने मी या पूर्ण क्षेत्रात नाइलाजास्तव मेंढ्या घातल्या आहेत.
- विठ्ठल महादेव लाहूडकर, शेतकरी, पोटळी.
0 Comments