Advertisement

ग्रामपंचायतचे रजिस्टर फाडतोड प्रकरणी नांदगाव तालुक्यातील आरटीआय कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर निर्दोष

*ग्रामपंचायतचे रजिस्टर फाडतोड प्रकरणी नांदगाव तालुक्यातील आरटीआय कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर निर्दोष*
नांदगाव - तालुक्यातील हिसवळ बु. येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर यांच्यावर सन 2014  मध्ये ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या रजिस्टर फाडतोड प्रकरणातून नुकतीच निर्दोष मुक्तता झालेली आहे.
      याबाबतचा घटनेचा सविस्तर तपशील असा की, श्री. लक्ष्मण बोगीर यांनी तत्कालीन हिसवळ ग्रामपंचायत कार्यकारणीकडे गावातील ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर परिसरातील रस्त्याच्या कामातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती विनया वैद्य यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज करुन माहिती मागितली होती. तसेच त्याची पोहच देण्यासाठी विनंती केली होती.परंतु सदर माहिती देण्याबाबत टाळाटाळ करुन तत्कालीन ग्रामसेविका वैद्य यांनी सरपंच व काही ग्रामस्थ यांना हाताशी धरुन श्री. लक्ष्मण बोगीर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 353-504-506- व 527 अंतर्गत श्री. लक्ष्मण बोगीर यांनी त्यांच्या कार्यालयातील रजिस्टर नमुना नंबर 9 चे रजिस्टर उचलून त्याची दोन पाने फाडल्याची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला होता. 2014 पासून सदरच्या गुन्ह्याचे कामकाज मालेगाव सत्र न्यायालयात सुरु होते. 
   सदरचा खटला नुकताच निकाली काढण्यात आला. यावेळी सदर खटल्यातील मुख्य तक्रारदार वैद्य यांचेसह प्रथम दर्शनी साक्षीदार तत्कालीन सरपंच श्री. शांताराम करवर व पांडुरंग बेंडके आणि पंच श्री. रवींद्र करवर व श्री. विलास देशमुख यांची उलट तपासणी व चौकशी केली असता. साक्षीदारसह पंच यांनी न्यायालयात सांगितले सदर दिवशी आमच्या समोर ग्रामपंचायत कार्यालयात अशा प्रकारचा कोणताही गुन्हा आरोपी लक्ष्मण बोगीर यांचेकडून घडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांचे सर्व साक्षीदार आरोपी विरोधात कोणताही सबळ पुरावा सादर करु शकले नाही. त्यामुळे सदरचा गुन्हा /आरोप हा केवळ ग्रामपंचायती मधील बिरोबा महाराज मंदिर परिसरातील  रस्त्याच्या कामातील झालेला गैरप्रकार झाकण्यासाठी व सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर यांचे गावातील सामाजिक / राजकीय वजन कमी करुन त्यांचे आर्थिक / मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच हेतूपुरस्कर नोंदविला गेला असल्याचे न्यायालयात निष्पन्न झाले असून उलट या तपासातून तक्रारदाराचे चुकीचे कृत्य आणि कर्तव्यप्रती असलेली सुस्त वृत्ती न्यायालयाच्या समोर आल्याने सदर गुन्ह्यातून श्री.  बोगीर यांची भारतीय दंडनीय गुन्हेच्या कलम 235 (1) नुसार मालेगाव सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. एस. कंठाळे यांच्या न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच फिर्यादीला अपील दाखल करण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिलेली होती. तसेच मुदत संपल्यानंतर जमा केलेला मुद्देमाल म्हणजे एक नोंदवही (रजिस्टर) ग्रामपंचायतकडे जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती कंठाळे यांनी दिलेले आहे.
     लक्ष्मण बोगीर हे कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष असून विशेष म्हणजे याच ग्रामपंचायती मध्ये सन 2010 मध्ये श्री. लक्ष्मण बोगीर हे मनोरुग्ण असल्याचा ठराव मनमानी पद्धतीने मंजूर करुन घेण्यात आलेला आहे. याबाबतही श्री. बोगीर हे न्यायालयात अब्रूनुकसान भरपाईचा (मानहानीचा) दावा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.
 सदर खटल्यात आरोपी लक्ष्मण बोगीर यांचेतर्फे ॲडव्होकेट श्री. भरत जाधव यांनी कामकाज पहिले.

Post a Comment

0 Comments