*वायरमनच्या निष्काळजीपणामुळे
खेर्डा बु मध्ये गावकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठ्याच्या अडचणी*
जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बु. येथे महावितरणच्या वायरमनच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जावे लागले. भावगिर महाराज ट्रान्सफॉर्मर सकाळी १० वाजल्यापासून बंद होता. स्थानिक वायरमन प्रमोद गाडकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजेरी लावली आणि त्यांच्या वागणुकीमुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला.
गावकऱ्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, गाडकर यांनी उलटसुलट उत्तरे देत ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याचे सांगितले आणि जबाबदारी झटकली. त्यांनी "ट्रान्सफॉर्मर बसविणे माझे काम नाही, इंजिनियरला बोलवा" असे सांगून फोन कट केला.
गावकऱ्यांनी जळगाव कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर रात्री १० वाजता एक टीम नवीन ट्रान्सफॉर्मर घेऊन आली. मात्र, तपासणीनंतर ट्रान्सफॉर्मर जळाला नसून फक्त ट्रिप झाला असल्याचे समजले आणि १० मिनिटांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
या प्रकारामुळे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
महावितरणने ट्रान्सफॉर्मर बिघाडाच्या तक्रारी तातडीने नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत ॲपचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेनंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
0 Comments