नांदगाव वार्ताहार - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु: येथील आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांचे बेमुदत उपोषण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिसवळ बु: येथे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८ वा. दरम्यान पाऊस चालू असताना गट नंबर ४४२ मधील विद्युत पोल पडला. सदर पोल दुसरे दिवशी वायरमन काळे व कॉन्ट्रॅक्टदार बाळासाहेब सोनवणे यांनी पोल पूर्ववत उभा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु शेतकरी ज्ञानेश्वर देशमुख व वायरमन तसेच कॉन्ट्रॅक्टदार यांच्या संगणमताने सदर पोल मूळ जागेपासून ४-५ फूट इतर ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. परिणामी सदर पोल ला तान देण्यासाठी तान रस्त्यावर येत असल्यामुळे सदर पोल विना तान चुकीच्या पद्धतीने देऊन पोल उभा केलेला असून सदर पोलमुळे पुढे धोका संभवतो असे बोगीर यांचे म्हणणे आहे. तसेच सदर पोल शेजारुन जाणारा रस्ता निंबायत रोड ग्रामपंचायत रेकॉर्डला ४० फुटाचा असून आज रोजी शेताचा बांध व रस्त्याच्या कडेची घरे यामधील अंतर फक्त १० फूट असल्याने पुढील दृष्टीने अतिक्रमानाचा विचार केल्यास सदर रस्ता दुरुस्ती वेळेस सदर रस्त्यालगतची घरे अतिक्रमणात येऊ शकतील असे बोगीर यांचे म्हणणे आहे. सदर पोल बाबत दिनांक १३ सप्टेंबर रोजी वायरमन काळे यांना ग्रामपंचायत मध्ये बोलावून सदर रस्ता हद्द व पोल चुकीचा उभा केल्याबाबत त्याच दिवशी निदर्शनास आणून दिले होते. परंतु वायरमनने आता अंधार पडेल गाव अंधारात राहील. उद्या पोल मूळ स्थितीत उभा करु असे म्हटले होते. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार रोजी वायरमन ला ग्रामपंचायत मध्ये बोलावून पुन्हा निदर्शनास आणून दिले. त्यावेळीही वायरमनने दोन-तीन दिवसात म्हणजे सोमवारी पोल पूर्वस्थितीत करण्याबाबत येईल असे आश्वासित केले होते. परंतु १५ दिवस झाल्यानंतरही वायरमनने कुठलीही हालचाल केली नाही त्यामुळे बोगीर यांनी संबंधित कार्यालयास ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज पाठवून पोल पूर्वस्थितीत करण्याची मागणी केली होती. सदर पोल 1962 पूर्वीचा त्या जागेवर उभा होता. त्यामुळे ग्रामपंचायत व विद्युत वितरण कंपनी ने कार्यवाही करुन सदर पोल मूळ स्थितीत उभा करण्यात यावा. पोल ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्वस्थितीत न केल्यास ६ ऑक्टोबर २०२५ पासून हिसवळ बु येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभा मंडपात बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असे बोगीर यांनी अर्जात नमूद केलेले आहे. परंतु आज पर्यंत संबंधित विद्युत वितरण कंपनी व ग्रामपंचायत कुठलीही हालचाल केलेली दिसून येत नसल्याने बोगीर यांचे ६ ऑक्टोबर पासून उपोषण निश्चित असल्याचे बोगीर यांनी पत्रकारांकडे बोलताना म्हटलेले आहे. आता विद्युत वितरण कंपनी व ग्रामपंचायत काय निर्णय घेतात याकडे तालुक्यासह पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
0 Comments