वरवट बकाल–जळगाव जामोद रस्त्यावर खचलेला पांडव पुल प्राणघातक दुरुस्तीअभावी नागरिकांमध्ये नाराजी!
संग्रामपूर तालुका
वरवट बकाल ते जळगाव जामोद या प्रमुख महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक स्वरूपात खचलेला पांडव पुलाचा भाग आजही दुरुस्त न झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मार्गावर काही महिन्यांपूर्वी केळीने भरलेल्या आयशर व ट्रॅक्टरचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी किंवा दुरुस्ती करण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे.
इंडियन गॅस गोडाऊन शेजारील या पुलाच्या ठिकाणी केवळ चुना किंवा पांढरा रंग मारून मार्किंग करण्यात आले; मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीला मागील अनेक महिन्यांपासून विलंब होत आहे.
दरम्यान, १ डिसेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा याच ठिकाणी अपघात होण्याचा प्रसंग ओढवला. मोटारसायकल घसरून ते किरकोळ जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे हलवण्यात आले.
या अपघातानंतर संभाव्य आणखी जीवितहानी टाळण्यासाठी आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका अध्यक्ष सोळंके यांनी स्वत आज सकाळी खचलेल्या पुलाच्या कडेला बेशरमाचे झाड लावून प्रतीकात्मक निदर्शने केली. “उद्या कोणाच्या तरी कुटुंबाला याचा फटका बसू नये,” असा त्यांचा इशारा आहे.
या मार्गावरून शाळा–कॉलेजचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दुरुस्तीअभावी कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी पांडव पुलाचा खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनासमोर जोरदारपणे मांडली आहे. बॉक्स - मी पांडव पुलावरील खसलेल्या भागा ठिकाणी नादुरुस्त रोडच्या काहीं दगडे व बेसर्माचे झाड लावून अधिकाऱ्यांना त्यांची जागा व कर्तव्य चे भान करून दिले संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे काम केले नाही तर भविष्यात भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. *भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष. देवराव सोळंके संग्रामपूर.*
0 Comments