Advertisement

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेच्या माध्यमातून दिलेला मानवतावादी विचार आत्मसात करा

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेच्या माध्यमातून दिलेला मानवतावादी विचार आत्मसात करा*
..ह.भ.प.प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे
ग्राम लांजुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित समाजप्रबोधनपर किर्तनाला हजारोंची उपस्थिती
 *खामगाव /(संतोष आटोळे)*                    विश्वाच्या पाठीवर मानवतेचे एकमेव पुजारी होवुन गेले ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता या अजरामर ग्रंथातुन केवळ खेडयांच्या विकासासाच विचार मांडला नाही तर संपुर्ण मानव जातीच्या कल्याणाचा आणि समतेचा संदेश दिला. देव मंदिरात नसुन तो मानवात आहे. जे-जे आपणांसी ठावे ते-ते इतरांसी सांगावे या उक्ती प्रमाणे जात-पात आणि धर्माच्या भिंती ओलांडुन एकमेकांना मदत करणे हीच खरी भक्ती असल्याचे ग्रामगीता सांगते, जगात माणसुकी हाच श्रेष्ठ धर्म आहे. म्हणुन माणुस घडविणे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा केंद्रबिंदु ग्रामगीतेमध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेला मानवतावादी विचार आत्मसात करावा असे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार ह.भ.प.प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांनी केले.रविवार दि.18 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्राम लांजुड येथे समाज प्रबोधनपर किर्तन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी उपरोक्त आवाहन केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा तर प्रमुख उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,प्रदेश सरचिटणीस गिरीधर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,माहुरगढ येथील दिगांबर महाराज, खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलाससिंग इंगळे,पिंप्री देशमुखचे सरपंच शेषराव गोरे,कदमापूरचे माजी सरपंच पवन पवार, शेगाव तालुका प्रमुख विजय काटोले,लांजुडचे माजी सरपंच दशरथ थेरोकार,अनंता धामोडे पाटील,राजेश धामनकार, राजु थेरोकार,रामदास थेरोकार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे आपल्या आपल्या दोन तासाच्या संगीतमय समाज प्रबोधनपर किर्तनाच्या माध्यमातून  प्रबोधनकार प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांनी सांगितले की, सध्या जगात माणुसकी नष्ट होत चालली आहे. ही चिंतनाची बाब आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आल्यामुळे देशातील  बहुजन समाजाच्या  तरुणांच्या डोक्यात चुकीचे विचार पेरले जात आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजा-समाजात भांडणे लावले जात आहे.कष्टकरी तरुणांची संख्या कमी होवुन युवा पिढी एैतखाऊ होत चालली आहे. सुशिक्षीत तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. म्हणुन अनेक तरुणांचे लग्नसुध्दा जुळत नाही. एक चांगला माणुस घडण्यासाठी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे असे सांगुन त्यांनी व्यसनांच्या दुष्पपरिणामावर कठोर प्रहार केला.‘ना धरती पहले है ना आसमान पहले है-कुराण और गीतामें इंसान पहले है,ये मंदिर और मस्जिद मसले आपको मुबारक हो, मेरे लिए तो मेरा हिंदुस्थान पहले है ’ अशी शेरो-शायरी सादर करुन उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज,हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या राष्ट्रप्रेम व देशभक्तीचे दाखले दिले. सकाळी जागे झाल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत ईश्वराने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने, सचोटीने पार पाडणे हेच खरे कर्मपुजन होय असे शुध्दकर्म अर्पण करणाऱ्या भक्तावर परमात्म्याची नक्कीच कृपा होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्माला सर्वोच्च स्थान देवुन विचार,वाणी आणि कृती यामध्ये पवित्रता जपावी. आपले कर्मच आपली ओळख ठरते आणि स्वच्छ कर्मातुन ईश्वरप्राप्तीचा मार्ग सापडतो असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये समतेची ज्योत पेटवुन समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले. प्राध्यापक प्रशांत महाराज ठाकरे हे गावा-गावामध्ये किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे. अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंतकरण शुध्द होवुन विधायक कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले व प्राध्यापक प्रशांत महाराज ठाकरे व त्यांच्या चमुने समाज प्रबोधनपर किर्तनासाठी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ दिल्याबदद्ल त्यांनी प्राध्यापक प्रशांत महाराज ठाकरे व त्यांच्या संपुर्ण चमुंचे आभार मानले.  
आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी सांगितले की,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रचार,प्रसार होण्यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळापासुन ते आजपर्यंत अनेक ठिकाणी  गुरुदेव सेवा मंडळाचे प्रार्थना मंदिर बांधुन दिले. मतदार संघात 1 लाख ग्रामगीतेचे वाटप केले.सोबतच अनेक भजनी मंडळांना भजन साहित्य,हजारो भग्ाव्या टोप्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे,पुतळयांचे वाटप केले. वैराग्यमुर्ती गाडगे महाराज यांचे विचार घेवुन जात-पात बाजुला ठेवुन गोर-गरीबांची कामे करण्यासाठी सानंदा हे सदैव तत्पर असतात असे त्यांनी सांगितले. 
सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रार्थनेने किर्तनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रीय किर्तनकार प्राध्यापक डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचा भगवी शाल व पुष्पहार घालुन श्रीफळ देवुन सत्कार केला तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सुध्दा  आयोजकांच्या वतीने शाल,श्रीफळ व भगवी टोपी देवुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन पंजाबरावदादा देशमुख यांनी केले. 
थंडीचे दिवस असतांना सुध्दा या  किर्तन कार्यक्रमाला माटरगाव,निम्मी,पिंप्री देशमुख,वाकुड, घाटपुरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह महिला भजनी मंडळाच्या महिला पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह  सुटाळा-वाडी जिल्हा परिषद सर्कल मधील  हजारो नागरीकांची उपस्थिती होती.राष्ट्रवंदनेने किर्तन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments