संग्रामपूर: दिं.२४संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ४० व्या दीक्षांत समारंभामध्ये कला ,वाणिज्य महाविद्यालय वरवट(बकाल)च्या प्रा.कल्पना राऊत (प्रा. कल्पना गुलाबराव इंगळे) यांना संत साहित्यामध्ये शोध प्रबंधाबद्दल आचार्य पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी २३ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठाचा ४०व्या दीक्षांत समारंभ देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोजजी पांडे यांचे प्रमुख उपस्थितीत कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, त्यांच्या मातोश्री महाराष्ट्र भूषण प्राचार्य श्रीमती कमलताई गवई यांची विशेष उपस्थिती तर विद्यापीठाचे प्रो-व्हाईस चान्सलर डॉ.महेंद्र ढोरे,विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे, डॉ.मोना चिमोटे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती. अमेरिका स्थिथ ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. सुलभा खर्चे ह्या त्यांच्या मार्गदर्शिका होत्या.
पश्चिम महाराष्ट्रातील पारनेर येथील ब्राह्मण समाजातील वारकरी संप्रदायातील जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य संत निळोबाराय यांच्या अभंग संपदेवर प्रा.कल्पना राऊत यांनी आपला शोध प्रबंध सादर केला होता. प्रा. कल्पना राऊत या मराठी, इंग्रजी आणि राज्यशास्त्र अशा तीन विषयात एम.ए.झालेल्या आहेत. संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
विशेष म्हणजे त्या कला, वाणिज्य महाविद्यालय वरवट (बकाल) येथे कार्यरत असून त्या ह्याच महाविद्यालयाच्या स्थापना वर्षातील बी.ए.च्या माजी विद्यार्थिनी सुद्धा आहेत. सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.स्वाती वाकेकर यांनी त्यांचे आचार्य पदवी बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments