*खामगावात गोमांस विक्रेत्यांवर शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई*
खामगाव/(संतोष आटोळे ) शहरातील फाटकपुरा व मस्तान चौक परिसरात अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी 23 मे रोजी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील फाटकपुरा, दालफैल परिसरात छापा टाकून पोलिसांनी संशयित शेख अहमद शेख समद यांच्या घरातून अंदाजे ७० किलो गोवंशाचे मांस जप्त केले. तसेच दुसऱ्या ठिकाणी एकूण ७ जिवंत बैल (गोवंश) ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.
याच कारवाईदरम्यान मस्तान चौक परिसरातील शेख आजम कुरेशी यांच्या घरातून अंदाजे ५० किलो गोवंशाचे मांस व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे २ लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. जप्त करण्यात आलेले गोमांस नगर परिषद खामगाव यांच्या सहकार्याने नष्ट करण्यात आले असून ताब्यात घेतलेल्या जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी शेख अहमद शेख समद, शेख आजाद शेख फत्ता व शेख आजम कुरेशी या तिघांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश अहेरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक सहभागी झाले होते.
0 Comments