Advertisement

शेतकऱ्यांना एमआरपी दराने खत विक्री करावी, खतांची कृत्रिम साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने रदद्‌‍ करा* ....... *माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी*

*शेतकऱ्यांना एमआरपी दराने खत विक्री करावी, खतांची कृत्रिम साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने रदद्‌‍ करा*
  ....... *माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी*
           सानंदांच्या निवेदनाची तात्काळ दखल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले कारवाईचे निर्देश
  मुंबई ः- आगामी खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डीएपी व युरिया खतांचा आवश्यक आणि निर्धारीत दरात पुरवठा व्हावा, तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवार दि.26 मे 2026 रोजी मुंबई येथील कृषी मंत्र्यांच्या दालनामध्ये राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेवुन निवेदन सादर केले.या निवेदनाची तात्काळ दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधिक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

  निवेदन सादर करतांना सानंदा यांनी कृषीमंत्र्यांसोबत चर्चा करतांना सांगितले की, खामगाव व शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हयातील अनेक कृषी केंद्र चालकांनी मोठ्या प्रमाणात डीएपी आणि युरिया खतांचा साठा करून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी खतांची मागणी केल्यानंतर त्यांना खत उपलब्ध करून दिले जात नसून, काही ठिकाणी डीएपी किंवा युरिया घेण्यासाठी इतर खतांची जबरदस्तीने लिंकिंग केली जात  आहे. तर काही कृषी केंद्र संचालकांकडून  सध्या 1350 रुपये कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) असलेली डीएपीची गोणी तब्बल 1750 रुपयांना विकली जात असून, 266 रुपये किंमतीची युरियाची गोणी 350 रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचे सानंदा यांनी कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.शेतकरी हिताचे सरकार म्हणून कृषी विभागाने या गंभीर प्रकाराला वेळीच आळा घालावा, कृत्रिम साठेबाजी थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सानंदा यांनी निवेदनात केली होती. 
      निवेदनाची तात्काळ दखल ः कृषी विभागाने केली भरारी पथकाची नेमणुक
सानंदांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षकांनी कृषीमंत्र्यांच्या आदेशानुसार खामगाव व शेगाव तालुक्यासाठी विशेष भरारी पथकाची नेमणुक केली आहे. तसेच कृषी विभागाकडून सर्व कृषी केंद्र चालकांच्या मोबाईल व्हॉटसॲपवर  खतांचा काळाबाजार टाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जादा दराने खत विक्री, लिंकिंगची सक्ती किंवा नियमबाह्य व्यवहार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार परवाने रद्द करण्याचाही इशारा कृषी विभागाने दिला आहे.तसेच बाहेरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येक दुकानात खतांचे अद्ययावत दरफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.लिंकिंगला नाही म्हणा हा फलक अनेक दुकानांमध्ये नसल्याचे निदर्शनास आल्याने तो तात्काळ लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द दिला व आपल्या निवेदनाची तात्काळ दखल घेवुन शेतकरी हितासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वीत केल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी शेतकऱ्यांच्या वतीने कृषीमंत्र्यांचे आभार मानले आहेत. शेतमालाला योग्य भाव नाही, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अश्या अस्मानी संकटामुळे सुध्दा जगाचा पोशिंदा बळीराजा हा आर्थिक संकटात सापडला आहे अश्या परिस्थितीमध्ये बळीराजाला कर्तव्य बुध्दीतुन सहकार्य करावे असे सानंदा यांनी सांगितले आहे.ज्या ठिकाणी कृषी विक्रेत्यांकडुन खतांची कृत्रीम साठेबाजी किंवा काळा बाजार केला जात असेल तर शेतकऱ्यांनी त्याची सर्व पुराव्या निशी आपल्याकडे तक्रार करावी.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय मिळवुन दिले जाईल असे आवाहन सुध्दा सानंदांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments