साई इंडियन ट्रस्ट असोसिएशनच्या भव्य विश्वविक्रम सोहळ्यात अमरावतीच्या श्रद्धा मंगेश कोल्हटकर यांचा पत्रकार भवन पुणे येथे सन्मान.. सौ गीता सोनोने
पुणे येथे साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन (SITA Trust) आयोजित भव्य "पुस्तक विमोचन, साहित्य गौरव व विश्वविक्रम नोंदणी सोहळा" उत्साहात संपन्न झाला. पत्रकार भवन ऑडिटोरियम, नवी पेठ, पुणे येथे आयोजित या कार्यक्रमास देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात मातृभक्त आचार्य सी. ए. प्रा. डॉ. शंकर धनश्यामदास अंदानी यांच्या विविध साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले. तसेच "बाबा – अबोल आयुष्याचे कोडे" या मराठी काव्यसंग्रहासह अनेक साहित्यकृतींची विश्वविक्रम नोंद करण्यात आली.
अमरावतीच्या युवा साहित्यिक सौ. श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) यांच्या कविता "बाबा – अबोल आयुष्याचे कोडे" या विश्वविक्रम नोंद झालेल्या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आल्या. यामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याचा विशेष गौरव झाला.
याच भव्य सोहळ्यात स्त्री जीवनावर आधारित त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्त्रीच्या भावना, संघर्ष, कर्तृत्व आणि जीवनातील विविध पैलूंवर आधारित या पुस्तकाला उपस्थित साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रद्धा कोल्हटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी, ओघवते आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल त्यांना "उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास महामंडलेश्वर योग सद्गुरु आचार्य डॉ. कृष्णदेव गिरी महाराज, खासदार मेधाताई कुलकर्णी, पद्मश्री उदय देशपांडे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सुधीर तारे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक, कवी, समाजसेवक व मान्यवर उपस्थित होते.
विश्वविक्रमाचा साक्षीदार ठरलेल्या या सोहळ्यात अमरावतीच्या श्रद्धा मंगेश कोल्हटकर यांनी साहित्य, लेखन आणि सूत्रसंचालन क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप पाडत अमरावतीच्या नावाला मानाचा तुरा खोवला.
श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) या शिक्षण, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
सध्या त्या पीएच.डी. संशोधक असून अमरावती येथील के.एल. महाविद्यालयात संशोधन कार्य करीत आहेत. त्यांनी एक आंतरराष्ट्रीय तसेच एक राष्ट्रीय संशोधन शोधनिबंध सादर केला आहे. याशिवाय त्या एम.ए.चे शिक्षण घेत असून एम.कॉम. पदवी प्राप्त केली आहे. बी.एड. शिक्षणादरम्यान त्यांना लालासाहेब देशमुख महाविद्यालय, तिवसा येथे "स्टुडंट ऑफ द इयर २०२३" हा बहुमान प्राप्त झाला.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मातोश्री विमलाबाई देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. तसेच महिला महाविद्यालय, अमरावती येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे.
साहित्य क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान असून त्यांनी प्रतिलिपी मराठी ॲपवर २०० हून अधिक लेख, कविता व कथा प्रकाशित केल्या आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे सातत्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झाले आहे. अनेक कवी संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून पुरस्कार प्राप्त केले आहेत.
त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना २०२५ मध्ये "राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, आदरणीय अदानी सर यांच्या "आई" या काव्यसंग्रहाच्या विश्वविक्रम नोंदीमध्ये समाविष्ट झालेल्या त्यांच्या दहा कवितांपैकी आठ कविता निवडण्यात आल्या.
याशिवाय त्यांना २०२५ मध्ये तिसऱ्या अमरावती जिल्हा परिवर्तन "विचारवेध साहित्य संमेलन" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सौंदर्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना २०२३ मध्ये "मिस अमरावती हिरकणी" पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांची "मिस महाराष्ट्र" स्पर्धेसाठी निवड झाली होती. विविध फॅशन शो आणि मॉडेलिंग स्पर्धांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला आहे.
नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२४ मध्ये संदीपनी स्कूलचा "बेस्ट डान्स परफॉर्मन्स अवॉर्ड" प्रदान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गाडगेबाबा प्रतिष्ठान, अकोला तसेच श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना "स्वर्गीय सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती यांच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार ने त्यांना २०२६ ला सन्मानित करण्यात आले.
शिक्षण, साहित्य, कला, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) या अमरावतीच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येत आहेत.
"या यशस्वी प्रवासात श्रद्धा मंगेश कोल्हटकर यांनी आपल्या कुटुंबाच्या मोलाच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. 'वडील चालायला शिकवतात, तर पती उंच उडायला बळ देतात. एका नात्याने पायांना आधार दिला, तर दुसऱ्या नात्याने स्वप्नांना आकाश दिले,' अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पती डॉ. मंगेश अनंत कोल्हटकर यांचीएम.ए.चे लाभलेली अमूल्य साथ, प्रोत्साहन आणि खंबीर पाठिंबा, सासरे श्री. अनंत कोल्हटकर व सासू सौ. अर्चना कोल्हटकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई सौ. रेखा डगवार, वडील श्री. अरुण डगवार आणि भाऊ शुभम डगवार यांचे प्रेम, विश्वास व सहकार्य यामुळेच हा प्रवास अधिक सक्षम आणि यशस्वी झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
'माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या कुटुंबाचा भक्कम आधार उभा आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ हेच माझ्या यशाचे खरे बळ आहे,' अशी कृतज्ञ भावना श्रद्धा कोल्हटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
0 Comments