Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करा*..... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी.

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करा*
..... माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची भेट घेवुन कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भांत दिले निवेदन
मुंबई :- कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ आणि शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे 
 जगाचा पोशिंदा बळीराजा हा संकटात सापडला आहे,असे असतांना राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे परंतु या योजनेतील जाचक अटींमुळे हजारो शेतकरी पुर्ण लाभापासुन वंचित राहण्याची शक्यता आहे.म्हणून राज्यातील जास्तीत जास्त  शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने या योजनेतील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत असलेल्या  अटींसह इतर जाचक अटी  काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात यावा  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.  
यासंदर्भात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सोमवार दि. 22 जून 2026 रोजी मुंबई येथील देवगिरी बंगला येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन त्यांना या मागणीसंदर्भात निवेदन सादर केले. सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी योजनेतील काही अटींमुळे अनेक पात्र शेतकरी पूर्ण लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. योजनेनुसार 1 एप्रिल 2019 नंतर कर्ज घेतलेल्या आणि 30 जून 2025 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांचीच मदत मिळणार असून उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागणार आहे.  बहुसंख्य शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला असल्याने सध्याच्या निकषांमुळे त्यांना केवळ 50 हजार रुपयांचा लाभ मिळेल. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित फायदा होणार नाही. परिणामी शासनाने मंजूर केलेल्या 36 हजार कोटी रुपयांच्या निधीपैकी फक्त 15 हजार कोटी निधी खर्च होऊन  मोठा निधी खर्च न होता शिल्लक राहणार आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत असून बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी निकषांमध्ये तातडीने बदल करावेत, अशी मागणी सानंदा यांनी केली.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील निकषांमध्ये बदल करण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. 
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याबद्दल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकरी बांधवांतर्फे आभार देखील मानले आहेत.

Post a Comment

0 Comments