जळगाव जामोद तालुक्यात महापुराचा कहर; घरांचे, शेतीचे, पशुधनाचे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान.. सौ गीता सोनोने
जळगाव जामोद तालुक्यात गुरुवार, दि. ३० जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. अवघ्या काही तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले, तर अनेक नद्यांना महापूर आला. पुराचे पाणी गावांतील वस्त्या आणि घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, मडाखेड, भेंडवळ, वडशिंगीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, घरगुती वस्तू आणि अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. अनेक रस्ते जलमय झाल्याने तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले.
महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांध वाहून गेले असून सिंचन व्यवस्था आणि शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या पशुधनाचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, पुराच्या तडाख्यामुळे महावितरणच्या वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल चार्जिंग, दळणवळण आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार पवन पाटील यांनी रात्री सुमारे ३ वाजल्यापासून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले तसेच महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित विभागांना तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त भागांमध्ये प्राथमिक पंचनामे सुरू करण्यात आले असून शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी एनडीआरएफचे पथक, मंडळ अधिकारी शिंदे, ग्रामसेवक संगीता शेजोल, तलाठी काळे, राजेंद्र उमाळे, रंगराव देशमुख, वासुदेव राजनकर, योगेश म्हसाळ, बाबुराव तायडे, गजानन मानकर, प्रवीण भोपळे, जयदेव वानखडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त पूल आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments