*युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय पालखी सोहळा संपन्न*
खामगाव /(संतोष आटोळे) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येथील युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि दिंडीच्या जल्लोषाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सोहळ्यात रिचल मुळे, स्वरा बोदडे आणि गार्गी या विद्यार्थिनींनी माता रुक्मिणी यांच्या भूमिका साकारल्या, तर वीरांश माने, सिद्धांत तायडे आणि आत्मज बायस्कर यांनी भगवान श्री विठ्ठलाची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. या चिमुकल्यांच्या देखण्या आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे शाळा परिसरात जणू प्रत्यक्ष पंढरपूरच अवतरल्याचा भास निर्माण झाला. उपस्थितांनी त्यांच्या अभिनयाचे आणि आकर्षक वेशभूषेचे भरभरून कौतुक केले.
इयत्ता चौथी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भक्तिमय नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढविली. विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज, टाळ आणि मृदंग घेऊन दिंडी काढत पालखीची भव्य परिक्रमा केली. "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री. गोपाल अग्रवाल, संचालिका सौ. अंजलीताई गोपाल अग्रवाल, प्राचार्य श्री. अनिरुद्ध अवचार, उपप्राचार्या सौ. अंकिता राठी, सौ. सोनाली नगरे, सौ. नीलिमा सारडा तसेच सौ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक आरती, पसायदान आणि महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अनुभवता आले. उपस्थित पालक व मान्यवरांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माविषयी आदरभाव अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ताईंनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा भक्तिमय पालखी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
0 Comments