Advertisement

लग्न" हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे आणि अनेक नात्यांचे सुंदर चित्र उभे राहते. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारा सोहळा नसून, आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याची पवित्र शपथ असते.

लग्न की करार?

"लग्न" हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे आणि अनेक नात्यांचे सुंदर चित्र उभे राहते. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारा सोहळा नसून, आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याची पवित्र शपथ असते.
पूर्वी लग्नात प्रेम, आपुलकी, विश्वास आणि नात्यांचा जिव्हाळा यांना सर्वाधिक महत्त्व दिले जायचे. साधेपणातही आनंद होता. पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले जायचे आणि आशीर्वाद हीच सर्वात मोठी भेट मानली जायची.
परंतु आजच्या काळात चित्र काहीसे बदलताना दिसते. लग्न हा आनंदाचा सोहळा राहण्याऐवजी अनेकदा प्रतिष्ठा, दिखावा आणि स्पर्धेचे माध्यम बनत आहे. कोणाच्या लग्नात किती खर्च झाला, किती महागडे कपडे होते, किती मोठा हॉल होता, किती पदार्थ होते, यावर चर्चा जास्त होते; पण नवदांपत्याच्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी आवश्यक असलेले प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर आदर याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्यांची बरोबरी करण्याच्या नादात कर्ज काढून किंवा स्वतःवर आर्थिक ओझे घेऊन लग्न करण्यापेक्षा आपल्या कुवतीनुसार, मनापासून आणि आनंदाने सोहळा साजरा करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लग्नाचा थाट काही दिवसांचा असतो, पण त्यानंतरचे वैवाहिक आयुष्य अनेक वर्षांचे असते.
आज अनेक ठिकाणी लग्नातील अपेक्षा, अटी, व्यवहार आणि आर्थिक गणिते इतकी वाढली आहेत की कधी कधी प्रश्न पडतो—हे लग्न आहे की करार? नात्यांची सुरुवात प्रेमाने व्हावी की व्यवहाराने? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.
खरे लग्न तेच, जिथे दोन मने एकमेकांना स्वीकारतात, एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करतात, संकटात हात सोडत नाहीत आणि सुख-दुःखात खंबीरपणे सोबत उभी राहतात. लग्नाची खरी श्रीमंती ही पैशात नसते, तर विश्वास, प्रेम, संयम आणि संस्कारांमध्ये असते.


आजकाल लग्नं मोठ्या थाटामाटात, लाखो रुपयांचा खर्च करून, डीजे, डेकोरेशन, प्री-वेडिंग शूट आणि अनेक सोहळ्यांसह केली जातात. पण एवढ्या दिमाखात झालेलं लग्न काही वेळा पंधरा दिवसांत किंवा महिन्याभरातच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतं. तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो—हे लग्न होतं की फक्त एक सोहळा?
लग्न म्हणजे खेळ नाही. तो आयुष्यभराचा निर्णय असतो. दोन वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या संस्कारात वाढलेली माणसं एकाच छताखाली राहायला लागतात. अशा वेळी मतभेद होणं स्वाभाविक आहे. पण मतभेद म्हणजे नात्याचा शेवट नव्हे.
स्वतःलाच एकदा विचारूया—एकमेकांना खरंच समजून घेण्यासाठी आपण किती वेळ दिला? एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी, स्वभाव, भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? की पहिल्याच वादानंतर नात्यावर पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला?
चूक कधी एकाची असते, तर कधी दोघांचीही असते. पण प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; नातं टिकवणं महत्त्वाचं असतं. "सॉरी" म्हणणं, माफी मागणं किंवा समोरच्याला माफ करणं हे कमीपणाचं लक्षण नाही. उलट, ते नातं जपण्याची ताकद आणि परिपक्वतेचं प्रतीक आहे. अहंकार नाती तोडतो, तर समजूतदारपणा ती अधिक घट्ट बांधतो.
प्रेम म्हणजे फक्त सुंदर फोटो, महागड्या भेटवस्तू किंवा सोशल मीडियावरील पोस्ट नाही. प्रेम म्हणजे संकटातही हात न सोडणं, राग आला तरी संवाद न तोडणं, आणि प्रत्येक वादानंतर पुन्हा एकदा एकमेकांकडे प्रेमाने पाहण्याची तयारी ठेवणं.
म्हणूनच, लग्नाचा खरा पाया थाटामाटात नाही, तर विश्वास, संयम, संवाद, समजूतदारपणा आणि तडजोडीत आहे. कारण संसार परिपूर्ण माणसांमुळे नाही, तर एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारणाऱ्या दोन मनांमुळे टिकतो.
लग्न एका दिवसाचा सोहळा असतो, पण संसार आयुष्यभराची जबाबदारी असते. सोहळा सुंदर असण्यापेक्षा नातं सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे.
आजकाल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. केवळ नवीन पिढीला दोष देऊन चालणार नाही; मुलं-मुलींसोबतच त्यांच्या आई-वडिलांनीही या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मग ते मुलाचे आई-वडील असोत किंवा मुलीचे.

आपल्या मुलांना संसार म्हणजे काय, नातं कसं जपायचं, मतभेद कसे सोडवायचे, एकमेकांना समजून कसं घ्यायचं आणि गरज पडली तर स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून माफी कशी मागायची, हे शिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

आपण आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की, अनेक वर्षे संसार करूनही आजही आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. आयुष्यभर माणूस शिकतच राहतो. मग फक्त पंधरा दिवस, एक महिना किंवा काही महिन्यांतच "आमचं पटत नाही" असा निष्कर्ष कसा काढता येईल?

एकमेकांना खरंच किती वेळ दिला? संवाद किती झाला? एकमेकांचा स्वभाव, सवयी, भावना समजून घेण्यासाठी किती प्रयत्न केले? हे प्रश्न स्वतःला विचारणंही तितकंच आवश्यक आहे.

नातं जोडणं सोपं असतं, पण ते आयुष्यभर जपणं खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी असते. संसारात प्रेमाबरोबरच संयम, समजूतदारपणा, तडजोड, संवाद आणि परस्पर आदर यांचीही गरज असते. प्रत्येक मतभेदाचा शेवट घटस्फोटातच व्हावा, अशी वेळ येऊ नये. कारण प्रत्येक नात्याला एक संधी, प्रत्येक माणसाला समजून घेण्यासाठी थोडा वेळ आणि प्रत्येक संसाराला फुलण्यासाठी थोडा संयम लागतो.

जिथे चूक असेल तिथे नक्कीच माफी मागा. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐका, एकमेकांना समजून घ्या, संवाद थांबवू नका. कारण "माफ करा" आणि "मला समजून घ्या" हे दोन शब्द अनेक तुटणारी नाती वाचवू शकतात.
लग्न हा व्यवहार नाही, करार नाही; तो विश्वास, प्रेम, त्याग आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन आहे. त्यामुळे लग्नाला करारात बदलू नका. त्याला प्रेम, समजूतदारपणा आणि जिव्हाळ्याने जपा. कारण जपलेलं नातं फक्त दोन व्यक्तींनाच नाही, तर दोन कुटुंबांनाही आनंद देतं.
लक्षात ठेवा, लग्न हा करार नसतो; तो आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा पवित्र संकल्प असतो. तो जिंकण्यासाठी नसतो, तर जपण्यासाठी असतो. म्हणून नात्यांना वेळ द्या, प्रेम द्या, समजून घ्या आणि क्षमा करायला शिका.
कारण लग्न कागदावरील सहीने टिकत नाही... ते विश्वास, प्रेम, संयम आणि परस्पर आदराने टिकतं. लग्नाला करारात बदलू नका; त्याला आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं बनवा.
लग्न हा एका दिवसाचा सोहळा नसून, आयुष्यभर एकत्र चालण्याचा प्रवास आहे. तो जिंकायचा नसतो... तो जपायचा असतो.
पैसा दोघांनाही जातो, खर्च दोघांनाही होतो, पण या सुंदर नात्याचा करार होऊन जातो तो फक्त कागदावर नाही तर दोन मनांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मनापासून जुळणं. सुख-दुःखात एकमेकांचा आधार होणं, एकमेकांच्या आनंदात हसणं आणि दुःखात खांदा देणं हेच खरं नातं.

अशा नात्यात कुठलाही कठोर करार नसतो, फक्त विश्वास असतो. थोडं तो समजून घेतो, थोडं ती समजून घेते, आणि मग हे नातं हळूहळू अजूनच सुंदर होत जातं. निभावलं तर संसार फुलतो, आणि फुललेला संसार फक्त घर नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंद देतो.

लग्न हा एका दिवसाचा सोहळा नसून, आयुष्यभर एकत्र चालण्याचा प्रवास आहे. तो जिंकायचा नसतो... तो जपायचा असतो. आणि जपलेलं नातं कधीच तुटत नाही, ते फक्त अधिकाधिक सुंदर होत जातं.

लेखिका :श्रद्धा मंगेश कोल्हटकर ( डगवार) अमरावती 
8766540513

Post a Comment

0 Comments