तेल्हारा तालुक्यात ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,हिवरखेड येथे एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सी. पी. भदोला यांनी एनसीसी युनिट मान्यता तपासणीसाठी भेट दिली. यावेळी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राठी, सेवानिवृत्त केंद्र शासनाच्या जहाज वाहतूक विभागाचे प्रशासकिय अधिकारी धैर्यशील भोपळे व हवालदार अविनाश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या तपासणीअंती एनसीसी कमांडर सी. पी.भदोला यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत एनसीसी युनिट मान्यता प्रदान करीत एनसीसी पथकाची मानवंदना स्वीकारली.मानवंदना स्वीकारण्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून एनसीसी ची कार्यपद्धती समजावून सांगितली. गेल्या ५० वर्षानंतर तेल्हारा तालुक्यात शाळास्तरावर नव्याने या युनिटला मान्यता मिळाली. या युनिटच्या माध्यमातून देशसेवेसह सामाजिक बांधिलकी जोपासल्या जाऊन सैनिक भर्ती, शासकीय नोकऱ्यात विविध संधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे मत संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या ठरावानुसार डॉ.अभिजित उगले यांची या एनसीसी पथकाच्या वैद्यकीय तपासणी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी भोपळे कॉलेजचे प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी प्रास्तविक पर मनोगत व्यक्त करीत या संधीचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दिला जाईल,अशी ग्वाही दिली. एनसीसी यूनिट अधिकारी डॉ. मयूर लहाने यांच्या मार्गदर्शनात एनसीसी युनिटचे छात्र यांनी संचालन केले. यावेळी केंद्रसहायक गणेश भोपळे, रामकृष्ण भड, अंबादास चाफे, निलेश दांडगे यांचे सहकार्य लाभले.
0 Comments