Advertisement

खामगावात साडेतेरा कोटी रामनाम जप संकल्पपूर्ती सोहळा तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज यांची उपस्थिती

खामगावात साडेतेरा कोटी रामनाम जप संकल्पपूर्ती सोहळा तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज यांची उपस्थिती
प्रतिनिधी नागेश सुरंगे
 बुलढाणा श्रीक्षेत्र माकोडी येथील समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज हे आपले संपूर्ण आयुष्य नामजपाच्या यज्ञकुंडामध्ये समिधा म्हणून खर्ची घालत आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाने खामगावकर भाविकांनी साडेतेरा कोटी रामनाम जप संकल्प पूर्ती केली आहे. या निमित्ताने तीन दिवस यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगदंबा देवी मंदिरासमोर आनंदनगर घाटपुरी (खामगाव) येथे १९, २० व २१ फेब्रुवारी २०२४ अशा तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने भाविकांनी केले असून समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज यांच्या दर्शनाच्या लाभ ही भाविकांना याप्रसंगी घेता येणार आहे. संत परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. दयाळू भगवंताच्या प्राप्तीचे श्रेष्ठ मार्ग संतांनी सांगितले आहेत. साखरखेर्डा येथील परमपूज्य सद्गुरु श्री. प्रल्हाद महाराज यांचे शिष्य असलेले श्रीक्षेत्र माकोडी येथील समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांनी विविध ठिकाणी भाविकांना साडेतेरा कोटी रामनाम जपाचे संकल्प देऊन ते पूर्ण देखील करून घेतले आहेत. या जपाची संकल्पपूर्ती यज्ञ सोहळ्याने होत असते. खामगाव मध्ये सुद्धा
भाविकांनी राम नाम जप संकल्प पूर्ण केला आहे. यासाठी यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता काकड आरतीने या सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर सात वाजता श्रीहारी महाराजांच्या हस्ते यज्ञकुंड प्रज्वलित करण्यात येईल. दुपारी अकरा वाजता रामपाठ नंतर नैवेद्य आरती, दीड ते तीन या वेळेत भाविक भजन सेवा देणार आहेत. दुपारी तीन ते पाच होम हवन आणि सायंकाळी सहा वाजता उपासना झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता ह.भ.प. श्री सुपेकर महाराज (घाटपुरी ) यांचे कीर्तन होईल. एकादशीला २० फेब्रुवारी रोजी सकाळी काकड आरती, नंतर होम हवन, रामपाठ आणि भजन ते उपासना असा नित्यक्रम सुरू राहील. रात्री आठ वाजता ह. भ. प. डॉक्टर सौ. कल्याणी पद्मने (अकोला) यांची कीर्तन सेवा होणार आहे. तर २१ फेब्रुवारीला पहाटे काकड आरती नंतर सकाळी सहा वाजता श्री. गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त प. पू. दिडे मामा यांच्या हस्ते गुलाल व प्रवचन होणार आहे. सकाळी आठ वाजता यज्ञ पूर्णाहुती पार पडल्यानंतर समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांचे
प्रवचन होईल. साडेनऊ वाजता काल्याच्या कीर्तनानंतर महाआरती व त्यानंतर दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. भाविकांनी तीनही दिवस कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम उपासना मंडळ खामगाव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments