Advertisement

मलकापूर येथील मतमोजणी केंद्रातील गैरसोयीबद्दल पत्रकारांची नाराजीमलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर येथील मतमोजणी केंद्रातील गैरसोयीबद्दल पत्रकारांची नाराजी

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचेसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे नियोजन ढासळल्याचा अनुभव हा वेळोवेळी प्रकर्षाने समोर आला. तर आज मतमोजणी दरम्यान मतमोजणी स्थळी वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना सुविधा उपलब्ध करून तर दिल्याच नाही व फेरीनिहाय निवडणूक निकालही देण्यास टाळाटाळ करत असल्याने पत्रकारांनी निवडणूक विभागाचा धिक्कार करीत निषेध व्यक्त केला. 
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झाली तेव्हापासून निवडणूक विभागाचा कारभार हा ढासळल्याची व बेजबाबदारपणाची प्रचिती वेळोवेळी आली. आज बेलाड यार्ड येथील कृउबासच्या परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पडत असतांना पत्रकारांना आतमध्ये प्रवेश तर दिला नाहीच उलट बाहेर एक टेंट टाकून त्यांना बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची कमतरता असल्याने अनेक पत्रकारांना उभेच रहावे लागले. तर निवडणुकीच्या निकालाची माहिती देत असतांना पत्रकारांना कुठलीही माहिती देण्यात येत नव्हती. तर त्याठिकाणी लावलेल्या भोंग्यावरूनही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. त्यावेळी पत्रकारांनी या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करीत आपला रोष व्यक्त करून प्रशासनाचा धिक्कार केला.
यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अशोकराव थोरात यांनी पत्रकारांची समजूत काढीत पत्रकारांना आवश्यक असलेली मतमोजणीची माहिती देण्याबाबत मतमोजणी प्रक्रियेतील अधिकार्‍यांना सांगितले. त्यांनतर मतमोजणीची माहिती देण्यात आली. मात्र निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतांना निवडणूक विभागाचे नियोजन गेल्या महिनाभरापासून पुर्णत: ढासळल्याचेच वेळोवेळी प्रकर्षाने समोर आले.
यावेळी उपस्थित बहुसंख्य पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच मतदान प्रक्रिया केंद्रामध्ये मोबाईलवर बंदी असतांना काही अधिकारी मशिनचा फोटो काढून तो व्हायरल करीत होते. ही बाब निवडणूक निरीक्षक (भाप्रसे) यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी सुध्दा नरमाईची भूमिका घेत संतप्त झालेल्या पत्रकारांची समजूत काढली व काढता पाय घेतला. यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी व निवडणूक विभागाचा निषेध नोंदविला.

Post a Comment

0 Comments