बळीराजाचा मार्ग मोकळा होणार! अतिक्रमित रस्ते हटवून पक्के रस्ते व वृक्षारोपणाचा आ.डॉ कुटेचा संकल्प...
जळगाव जामोद (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शेत रस्त्याचे वाद मिटावेत, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला जळगाव जामोद मतदारसंघात वेग आला आहे. मतदारसंघातील सर्व अतिक्रमित शेत रस्ते तातडीने मोकळे करून त्या ठिकाणी पक्के रस्ते व वृक्षारोपण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
गुरुवार, २६ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, तहसीलदार पवन पाटील, ठाणेदार नितीन पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
______________________
महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त मोहीम...
अनेक वर्षांपासून शेत रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात, तसेच पेरणी व कापणीच्या हंगामात शेतमाल वाहून नेण्यास मोठी अडचण येते. हे अडथळे दूर करण्यासाठी आता महसूल आणि पोलीस विभाग संयुक्तपणे मोहीम राबवणार आहे. तालुक्यातील संपूर्ण अतिक्रमित रस्ते कोणताही भेदभाव न करता मोकळे करण्याचे निर्देश आमदार कुटे यांनी यावेळी दिले.नियोजनानुसार ही योजना तीन टप्प्यात राबवली जाईल:१. अतिक्रमण निर्मूलन: अडवलेले रस्ते कायदेशीर प्रक्रियेद्वारे मोकळे करणे.२. पर्यावरण रक्षण: रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे, जेणेकरून रस्त्याची सीमा निश्चित होईल आणि सावलीही मिळेल.३. मजबुतीकरण: मोकळे झालेले रस्ते केवळ मातीचे न ठेवता, त्यावर खडीकरण करून ते पक्के आणि बारमाही करणे.या बैठकीमुळे मतदारसंघातील शेकडो रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मोजणी शुल्काची माफी आणि पोलीस बंदोबस्ताचे सहकार्य मिळणार असल्याने ही प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत.यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी, आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्विय्य सहाय्यक प्रकाश राऊत, डॉ.शेख व पत्रकारांची उपस्थिती होती.
______________________
"शेतकरी राजाच्या समृद्धीसाठी शेतापर्यंत पोहोचणारे रस्ते अडथळा मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेत रस्त्यांवरील अतिक्रमणांचे वाद मिटवून, जळगाव जामोद मतदारसंघातील प्रत्येक शेत रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते' योजनेच्या माध्यमातून आपण केवळ रस्ते मोकळेच करणार नाही, तर त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण करून शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे सुलभ करणार आहोत. प्रशासनाने ही मोहीम मिशन मोडवर राबवावी, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील एकाही शेतकऱ्याला रस्त्याअभावी अडचण येणार नाही."
आमदार डॉ.संजय कुटे..
______________________
0 Comments