Advertisement

जळगाव जामोद शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त.. दुकानदारावर गुन्हा दाखल

जळगाव जामोद शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त.. दुकानदारावर गुन्हा दाखल...

पर्यावरणास घातक आणि मानवी जीवनास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी शहरात विशेष मोहीम राबवली जात असून, खारीबावडी परिसरातील एका जनरल स्टोअर्सवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे.

ही धडक कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकामध्ये पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय नागेश खाडे, पो.हे.काँ. संजय वेरुळकर, निलेश पुंडे, सचिन राजपुत, अयुब शेख यांचा समावेश होता. या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने ही कारवाई यशस्वी केली.जुना भाजीबाजार भागातील रहिवासी राजेश प्रभुदासजी पलन (वय ५० वर्षे) हा आपल्या 'राजेश जनरल स्टोअर्स' मधून शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची चोरटी विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता, तिथे विविध नामांकित कंपन्यांचे नायलॉन मांजाचे रीळ मिळून आले.पोलिसांनी या कारवाईत स्टार पतंग, मांजा मेकर, पांडा स्पेशल, इंडियन मांजा, छोटा भीम, NRK GOLD आणि भगवान पतंग भांडार अशा विविध कंपन्यांचा एकूण २,२१० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
या प्रकरणी पोउपनि नारायण सरकटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश पलन विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५, १५ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजय वेरुळकर करत आहेत.
______________________
"नायलॉन मांजा मानवी जीवनासाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी अत्यंत जीवघेणा ठरत आहे. शासनाने यावर पूर्णतः बंदी घातली असून, जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत अशा प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी मकर संक्रांतीचा सण साजरा करताना पर्यावरणापूरक सुती धाग्याचा वापर करावा. नायलॉन मांजा विकताना किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
— नितीन पाटील, 
 ठाणेदार, पोलीस स्टेशन जळगाव जामोद. 
____________________

Post a Comment

0 Comments