*विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने पालक, श्रोते मान्यवर भारावले*
*खामगाव/(संतोष आटोळे) “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि कलागुण दडलेले असतात. त्यांना योग्य दिशा व सक्षम व्यासपीठ मिळाल्यास ते जागतिक स्तरावर नक्कीच आपली छाप पाडू शकतात,” असे प्रतिपादन शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. किरणजी सरनाईक यांनी केले.
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘अविष्कार स्नेहसंमेलन २०२६’ च्या बक्षीस वितरण समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. दि. ११ व १२ जानेवारी रोजी पार पडलेल्या या स्नेहसंमेलनाचा समारोप आज राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर सचिव सौ. सुरेखाताई गुंजकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या सोहळ्यास सरस्वती हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोकराव खोरखेडे, साहेबराव भरणे (अध्यक्ष, मेस्टा, अकोला), पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक आशुतोष कोहळे असिस्टंट मॅनेजर उमेश मलकापूरकर, नगरसेविका गायत्री तासतोडे, उपसरपंच विश्वनाथ वयतकार, शरद बकाल, उमाकांत खांडेकर, संदीप खराबे, आवार येथील पोलीस पाटील तसेच सरपंच आशाताई गवई खोमणे सर (जि.प. शिक्षक), प्रा. मडके सर, सतीश रायबोले (प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालय) व रवींद्र मांडवेकर (प्राचार्य, जिजाऊ स्कूल) पत्रकार महेश देशमुख, योगेश हजारे, आनंद गायगोल व अनुप गवळी यांच्यासह
सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल हिवराळे सर, अभिषेक देशमुख सर व विशाल घोडके सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या सोहळ्यास आवार परिसरातील हजारो पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाव–बेटी पढाओ’, ‘पर्यावरण संवर्धन’ व ‘भारतीय संस्कृती’ या सामाजिक विषयांवर आधारित पथनाट्ये सादर केली. यासह कोळी नृत्य, लावणी तसेच छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. शालेय चिमुकल्यांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा प्रभावी ‘अविष्कार’ घडवून आणला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी दिल्ली येथे झालेल्या शूटिंग रायफल इंडियन ट्रायल टीममध्ये निवड झालेल्या गुंजकर महाविद्यालयाच्या हर्ष बकाल यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार आमदार किरणजी सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
बक्षीस वितरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments