*महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची जाण असणारा लोकनेता काळाच्या पडद्याआड*
खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजितदादा पवार साहेब हे शब्दाचे धनी होते , असंख्य जनतेच्या विधायक कामांसाठी निरंतर अथक प्रयत्न करणारा , महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची जाण असणारा लोकनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वांनाच अपरिमित दुःख झालेले आहे. दादा स्वर्गीय झाले , देवा घरी गेले यावर क्षणभरही कुणाचा विश्वास बसत नाही. तळपणारा सूर्य मधेच मावळल्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे, या दुर्दैवी घटनेने केवळ पवार परिवारच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विकास प्रक्रियेला कधीही न भरून येणारी मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत खामगाव विधानसभा मतदार संघाचे नेते व माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोक संवेदना व्यक्त करतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,28 जानेवारी हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. अजितदादा पवार साहेब यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली, तेव्हा क्षणभर विश्वासच बसला नाही. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. माझे आणि अजितदादांचे संबंध अतिशय जुने होते. सन 1999 ते 2014 या कालावधीत मी आमदार असतांना अजितदादा पवार यांनी आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषविली. त्या काळात त्यांची काम करण्याची शिस्त, प्रशासनावर असलेली जबरदस्त पकड आणि प्रत्येक विभागाचा सखोल अभ्यास मी अगदी जवळून अनुभवलेला आहे. राजकारणात असा अभ्यासू, कर्तबगार आणि निर्णयक्षमताअसणारा नेता मिळणे दुर्मिळ असते. महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तरीसुद्धा अजितदादा खचले नाहीत. पराभवातून शिकत त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाची सत्ता आणण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने काम सुरू केले.अजितदादांनी कधीही आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वांशी तडजोड केली नाही. विकासावर निस्सीम प्रेम करणारा, स्पष्ट वक्ता आणि ठाम भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांना सर्वपक्षीयांमध्ये आदराचे स्थान होते.
जे काम होऊ शकते त्याला ठाम होकार आणि जे शक्य नाही त्याला तितक्याच स्पष्टपणे नकार देण्याचा प्रामाणिक स्वभाव अजितदादांचा होता. 12 जून 2025 रोजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी हजारो लोकांच्या साक्षीने अजितदादांनी सांगितले होते की, जसे स्व. विलासरावजी देशमुख यांनी मला प्रेम दिले, त्याहून अधिक प्रेम ते मला व खामगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना देतील. आज त्या शब्दांची आठवण येतांना मन अधिकच व्याकूळ होते.
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आमचे स्वप्न होते. भविष्यात अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची सर्वांची मनोमन इच्छा होती,परंतु या दुर्दैवी घटनेमुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले,अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सानंदा परिवार आणि खामगाव विधानसभा मतदारसंघ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकनेते अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0 Comments