जळगाव जामोद (प्रतिनिधी):
अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आसलगाव शिवारात घडली आहे. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक दुर्गा तायडे (वय ४०, रा. निमगाव, ता. नांदुरा) हे आपल्या मित्रासह मोटारसायकलने जात असताना, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आसलगाव शिवारात हा अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून तायडे यांच्या मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक दुर्गा तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला मित्र या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी जानराव लक्ष्मण आसलकर (वय ४३, रा. निमगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २८१, १०६(१), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या १३४/७७ अन्वये गुन्हा (अप.क्र. ७८/२०२६) दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.आरोपी वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती खंगाळत आहेत.
0 Comments