Advertisement

शेगावात चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा'चा समारोप; हजारो नागरिकांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ*

*शेगावात चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा'चा समारोप; हजारो नागरिकांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ*

*रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने शेगावात आरोग्य शिबिर यशस्वी*

*बुलढाणा,(जिमाक) दि.२८:*  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी माझ्यावर विश्वास टाकून आयुष मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या आपल्या भारतीय उपचार पद्धती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. या शिबिराच्या माध्यमातून  जनसामान्यांची सेवा करता आली, याचे आत्मिक समाधान आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे," असे प्रतिपादन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी समारोप प्रसंगी केले.

बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य  मेळावा २०२६' आज नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटपाने यशस्वी समारोप झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोठ्या उत्सवात झाले. या आरोग्य मेळाव्यात चार दिवसांत सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधींचा लाभ घेतला.तसेच  देशभरातून आलेल्या १५ हून अधिक आयुर्वेद आणि योग तज्ज्ञांनी नवीन डॉक्टरांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान केवळ उपचारच नाही, तर जनजागृतीवरही भर देण्यात आला. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी ९ नामांकित औषधी कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांशी (FPOs) खरेदी करार (MoUs) केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 जिल्ह्यातील सुमारे ४ हजार आशा स्वयंसेविकांना 'आजीबाईचा बटवा' हे पुस्तक देऊन घरगुती पारंपरिक उपचारांचा प्रसार घराघरापर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सुमारे २,७५० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेली कृत्रिम अवयवे, बॅटरीवर चालणाऱ्या सायकली व इतर साहित्याचे मोजमाप घेण्यात आले असून, एका महिन्यात त्याचे वाटप केले जाणार आहे. आज शेवटच्या दिवशी १० हजार मोफत चष्म्यांचे वाटप करून नेत्ररुग्णांना दिलासा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत गजानन महाराज संस्था, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
00000

Post a Comment

0 Comments