*राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६: शेगावात होमिओपॅथीचा दैदिप्यमान ठसा*
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झालेला राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६ सध्या शेगाव येथे उत्साहात पार पडत असून राज्यासह देशभरातून नागरिक, तज्ञ डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्धा आणि योग या पारंपरिक उपचारपद्धतींचा समन्वय या मेळाव्यात अनुभवायला मिळत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या भव्य मेळाव्यात पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, खामगाव यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. महाविद्यालयाचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. विप्लव कवीश्वर यांनी “होमिओपॅथिक मॅनेजमेंट ऑफ अँक्झायटी डिसऑर्डर” या समकालीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. वाढत्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर डिसऑर्डरवरील होमिओपॅथिक उपचारांची परिणामकारकता, केस-टेकिंगची शास्त्रीय पद्धत, इंडिव्हिज्युअलायझेशन व समग्र उपचार दृष्टिकोन यांचे त्यांनी प्रभावी विवेचन केले. त्यांच्या संशोधननिष्ठ आणि चिकित्सक अनुभवसमृद्ध मांडणीमुळे उपस्थित वैद्यकीय तज्ञ, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. मेळाव्यात विविध आयुष शाखांशी संबंधित अनेक महाविद्यालयांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. त्याच वेळी डॉ. जयश्री ढोकणे यांचे व्याख्यानही अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कवीश्वर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकवृंद यांनी डॉ. विप्लव कवीश्वर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या प्रभावी व्याख्यानामुळे पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे होमिओपॅथी उपचारपद्धतीबाबत जनजागृती अधिक बळकट होत असून आरोग्य क्षेत्रात सकारात्मक व आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments