*खामगावात शिवसेना आक्रमक! अवैध बायोडीझेल आणि निवासी क्षेत्रातील पेट्रोल पंपाविरोधात रणशिंग*
खामगाव व नांदुरा तालुक्यातील सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या अवैध धंद्यांविरुद्ध आता शिवसेना आक्रमक झाली आहे. विनापरवाना सुरू असलेले जीवघेणे बायोडीझेल पंप आणि निवासी वस्तीत उभारला जाणारा पेट्रोल पंप या मुद्द्यांवरून शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र रामदास बघे यांनी थेट केंद्र सरकारकडे दाद मागितली असून प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.
'डेथ ट्रॅप' बनलेल्या अवैध पंपांवर कारवाई करा!
राजेंद्र बघे यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव यांना दिलेल्या तक्रार अर्जात खळबळजनक आरोप केले आहेत. पिंप्राळा फाटा ता खामगाव आणि वडनेर भोलजी ता नांदुरा या परिसरात कोणत्याही परवानगी (NOC)शिवाय सर्रासपणे अवैध बायोडीझेल (LDO मिश्रित) विक्री सुरू आहे.
यापूर्वी अशाच अवैध पंपांमुळे नायगाव फाट्यावर एका कामगाराचा मृत्यू झाला होता,तर वडनेर भोलजी येथे दोन जणांचा टाकीत पडून बळी गेला आहे. "प्रशासन अजून किती बळींची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
निवासी वस्तीत पेट्रोल पंप कशासाठी?
खामगाव शहरातील जमजम कॉलनी (चिखली रोड) या दाट लोकवस्तीच्या भागात सर्व्हे नं. ४२/३ मध्ये पेट्रोल पंपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक जनतेचा या कामाला तीव्र विरोध असतानाही प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिलाच कसा, हा संशोधनाचा विषय असल्याचे बघे यांनी पत्रात म्हटले आहे. हा पंप सुरू झाल्यास भविष्यात भीषण स्फोट होऊन निष्पाप रहिवाशांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचा थेट इशारा
तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे की:
सर्व अवैध बायोडीझेल पंप तातडीने सील करावेत.
झमझम कॉलनीतील पेट्रोल पंपाला दिलेली एन.ओ.सी. (NOC) त्वरित रद्द करण्यात यावी.
दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मालकांवर कडक कारवाई करावी.
या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,जिल्हा पुरवठा अधिकारी,आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. जर प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर शिवसेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे,अल्प संख्याक आघाडी शहर प्रमुख परवेज पठाण, शिवसेना उप शहर प्रमुख भाऊ बिडकर,आदी उपस्थित होते.
0 Comments