खामगाव येथे घरगुती वाद एवढा टोकाला गेला की पती प्रकाशने पत्नी सविताला कायमचे जीवनातून संपविले. लोखंडी सब्बलने डोक्यावर वार करून तिची हत्या केली.
खामगावातील खळबळजनक घटना
खामगाव : घरगुती वाद एवढा टोकाला गेला की पती प्रकाशने पत्नी सविताला कायमचे जीवनातून संपविले. लोखंडी सब्बलने डोक्यावर वार करून तिची हत्या केली. खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरामधील झोपडपट्टीमध्ये १४ मेच्या रात्री साडेअकराच्या सुमारास हा खुनी थरार घडला. पत्नीला मारून टाकल्यानंतर आरोपीने तडक पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.
सविता प्रकाश सोळंके (वय २२) असे पतीच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. पती प्रकाश रुपलाल सोळंके (वय २५) याच्यासोबत सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेऊन सविता सासरी नांदायला आली. मात्र, त्यांचा सुखाचा संसार काही काळच टिकला. ज्याच्या सोबत सातफेरे घेतले, सातजन्म सोबत राहू देण्याची शपथ घेतली, तोच तिच्या जीवावर उठला. दोघांमध्ये कौटुंबिक कलह विकोपाला गेले. प्रकाश व पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणावरून १४ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वाद झाला. त्यांच्यातील वाद एवढा वाढला की प्रकाशने पत्नीला कायमचे संपवून टाकले. लोखंडी सब्बलने डोक्यावर मारहाण केल्याने सविता रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाली. दोघांमधील वादाची माहिती समजताच रेल्वे गेट परिसरात राहणारे संजय मेढे त्यांच्या घरी गेले असता आरोपी प्रकाशच्या हातात लोखंडी सब्बल आढळून आली, तर सविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ‘मी सविताला मारले असून स्वत: पोलीस स्टेशनला जात आहे’ म्हणत आरोपी प्रकाश पोलिसांसमोर हजर झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. दरम्यान, संजय मेढे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील करीत आहेत.
0 Comments