खामगाव, दि. २४ : (उमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात “मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६” (SIR) राबविण्यात येत असून, बुलढाणा जिल्ह्यात या मोहिमेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, नियोजन आणि तांत्रिक पूर्वतयारी करण्यात येत आहे.
या मोहिमेत पात्र मतदारांची नावे सुनिश्चित करण्यात येणार असून, दुबार नोंदी, मृत तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदार यादीतील अस्पष्ट फोटो दुरुस्ती, समान जनसांख्यिक तपशील (DSE) व समान फोटो असलेल्या नोंदींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे सविस्तर प्रशिक्षण दि. २३ जून २०२६ रोजी सौभाग्य लॉन्स, वाडी, खामगाव येथे आयोजित करण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले.पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. यावेळी ‘Enumeration Form’ चे वाटप करून आवश्यक माहिती संकलित केली जाईल. घर बंद असल्यास संबंधित फॉर्म दारात टाकून त्याची नोंद ‘BLO App’ वर करणे बंधनकारक राहणार आहे.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर दावे व हरकती स्वीकारून दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण प्रक्रियेत जमा झालेल्या फॉर्म्सचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, दररोज किमान १० टक्के माहिती ‘BLO App’ वर अपलोड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची ‘AASD’ यादी तयार करून त्याची नियमानुसार पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.दि. ३० जून ते २९ जुलै दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करून आवश्यक माहिती अचूकपणे भरून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि अपात्र मतदार यादीत राहू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे,” असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले आहे.
0000000
0 Comments