अवैध रेती उपशाचे शूटिंग घेणाऱ्या पत्रकाराला मारहाण
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी शिवारात खडकपूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाचे व्हिडिओ चित्रीकरण करणारे पत्रकार रामदास कहाळे यांना रेती माफियांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपस्थित पोलिसांनी पत्रकाराला बाजूला केले आणि त्यानंतर उलट पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाने निषेध नोंदवित पत्रकारावरील खोटे गुन्हे परत घेण्याची मागणी केली.
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी शिवारातील रेती घाटातून १९ मे २०२६ रोजी जेसीबी आणि पोकलँड मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू होता. या बेकायदेशीर कामाची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार रामदास कहाळे हे बातम्यांच्या दृष्टीकोनातून कव्हरेज करण्यासाठी आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी घटनास्थळी गेले होते.
दरम्यान, तढेगाव फाटा येथे ग्रामस्थांनी या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात उपोषण व रास्ता रोको केला होता. पत्रकार कहाळे तेथेही व्हिडिओ चित्रीकरण करत असताना, संतापलेल्या रेती माफियांनी त्यांना जाहीरपणे मारहाण केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत पत्रकाराला बाजूला काढले.
मात्र, त्यानंतर रेती माफियांच्या दबावाखाली किंवा अन्य कारणांमुळे किनगाव राजा पोलिसांनी थेट पत्रकार रामदास कहाळे यांच्यावरच गुन्हे दाखल केले. दरम्यान पत्रकाराविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्या या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जगताप यांच्या नेतृत्वात सुनील मतकर (जिल्हा कार्याध्यक्ष), मुशीर कोटकर (जिल्हा उपाध्यक्ष), सन्मती जैन (तालुका सचिव),अशरफ पटेल कार्याध्यक्ष,विजय जाधव व शे. हनिफ (तालुका उपाध्यक्ष), पुजा कायंदे (तालुका कोषाध्यक्ष) यांच्यासह अर्जुन आंधळे,देवानंद झोटे,नंदू देशमुख, बाबुराव नागरे, महंमद जमील आदींची उपस्थिती होती.
0 Comments