शेगाव: नागरिकांना एकाच छताखाली पारदर्शक आणि त्वरित शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा (टप्पा-१) आज शेगाव येथे मोठ्या उत्साहात समारोप झाला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी टाऊन हॉल येथे आयोजित या शिबिराला शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री. सदाशिव शेलार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. प्रकाशराव शेगोकार, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई सुळ, उपविभागीय अधिकारी (खामगाव) श्री. रामेश्वर पुरी, तहसीलदार श्रीमती प्रज्ञा काकडे, मुख्याधिकारी श्रीमती जयश्री काटकर, गट विकास अधिकारी श्री. चंदनसिंग राजपूत, भूमिअभिलेख उपअधीक्षक श्री. रवींद्र सोनार, तालुका कृषी अधिकारी श्री. अभिमन्यू चोपडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सेतू व आधार केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरातील प्रमुख लाभ:
या शिबिराद्वारे शेकडो नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
महसूल विभाग: २०५ फेरफार नोंदी, २३२ डिजिटल ७/१२ चे वाटप आणि ७/१२ दुरुस्तीसाठी २४ अर्ज स्वीकारण्यात आले.
प्रमाणपत्रे व कार्ड वाटप: १३२ लाभार्थ्यांना विविध दाखले/प्रमाणपत्रे, १९ लाभार्थ्यांना नवीन/दुरुस्त रेशनकार्ड, तर ५८ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
समाज कल्याण व गृहनिर्माण: संजय गांधी निराधार योजनेचे २३ लाभार्थी आणि पंतप्रधान, रमाई व शबरी आवास योजनेअंतर्गत २५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
कर्ज व उद्योग योजना: पी.एम. स्वानिधी अंतर्गत ९ लाभार्थ्यांना कर्ज वितरण आणि पी.एम. सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत ४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
कृषी विभाग: ३ लाभार्थ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले.
अनेक सुविधांची उपलब्धता:
शिबिरात केवळ लाभ वाटपच झाले नाही, तर जमीन जोडणी, शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे, ई-मोजणी अर्ज, लक्ष्मी मुक्ती व सलोखा योजना अर्ज, लाडकी बहीण योजना केवायसी आणि आधार कार्ड अद्ययावत करणे यांसारख्या सुविधाही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
मार्गदर्शन व आवाहन:
याप्रसंगी कृषी विभागातर्फे पीक पेरणीबाबत तर पंचायत समितीमार्फत शेत सिंचन विहीर योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्री. रामेश्वर पुरी यांनी नागरिकांना आवाहन केले की, सर्वांनी स्वगणना करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच १/१/२०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करणे आणि तुकडे बंदीमुळे प्रलंबित राहिलेल्या खरेदीची नोंद घेणे यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. यावेळी उभारण्यात आलेल्या जनगणना कक्षात २३ नागरिकांनी आपली स्वगणना पूर्ण केली.
तहसीलदार कार्यालयाने शेगाव शहरातील नागरिकांनी दिलेल्या या कौतुकास्पद प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.
तहसीलदार कार्यालय, शेगाव
0 Comments