Advertisement

११वीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर!देऊळघाटमध्ये अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची मागणी – अन्यथा १४ ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन..

११वीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर!


देऊळघाटमध्ये अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची मागणी – अन्यथा १४ ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन..


 बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (उर्दू माध्यम) येथे इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच तुकडी उपलब्ध असल्याने, अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. यासंदर्भात पत्रकार सैय्यद इरफान सैय्यद अख्तर यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे आणि एका वर्गासाठी ६० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. देऊळघाट परिसरातील विद्यार्थी संख्येचा विचार करता, एकाच तुकडीमुळे अनेक हुशार आणि इच्छुक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

अर्थिकदृष्ट्या दुर्बल पालक आपल्या मुला-मुलींचे शिक्षण देण्यासाठी मेहनत करत आहेत. मात्र अतिरिक्त तुकडी उपलब्ध न झाल्यास त्यांना मुलांना बाहेरगावी पाठवावे लागेल, ज्याचा खर्च परवडणारा नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गावातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे निवेदने दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

जर तात्काळ योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह पालकांचे अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments