निकृष्ट दर्जाच्या कामाची दीड महिना उलटूनही कोणतीच चौकशी नाही आंदोलनाचा इशारा
जळगाव जामोद प्रतिनिधी...
पाणलोट आधारित नाला उपक्रमामध्ये सिमेंट नाला बांध उपक्रमास अनन्य साधारण महत्व आहे. ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध घेण्यासाठी तांत्रिक दृष्टया योग्य जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिमेंटचे नाला बांध बांधून पाणीसाठा केला जातो. यामुळे भूपृष्ठामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होवून नाल्यालगतच्या विहीरींच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत असते.
पर्यायाने विहीरीखालील बागायती क्षेत्रामध्ये वाढ होते.या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 पासून राज्यातील टंचाईग्रस्त जिल्हयांमध्ये पाणलोट आधारित एकेरी पध्दतीने सिमेंट नालाबांधाचा उपक्रम हाती घेतलेला आहे.
यातच जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ही जलसंधारण विभाग खामगाव यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांध बनवण्याचे काम सुरू असून यातील तीन सिमेंट बंधारे हे सुनगांव येथील वावडी हरदो या शेतशिवारातील निरव व कोरडी नदी वर होत आहेत. या ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामात कमी प्रतीचे साहित्य वापरले जात आहे. वाळू, खडी आणि सिमेंटचे प्रमाण योग्य नाही. यामध्ये नदीतीलच माती मिश्रित वाळू व दगड वापरल्या जात असून लोखंड ही अत्यल्प प्रमाणात व त्याची साईज ८ एमएम एवढीच असुन बंधाऱ्याला आतापासूनच भेगा पडल्याचे दिसून येत आहे. तर या ठिकाणी दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र होऊन पावसाळ्यात येणाऱ्या नदीच्या पुरामुळे हे सिमेंट बांध तुटण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन शेतातील पिके उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामाची देखरेख करणारे ज्युनियर अभियंता कवाडे हे चौकशीच्या घेऱ्यात येत असून कवाडे हे सिमेंट बंधाऱ्याचे कामावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. कवाडे यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मात्र आपल्या मनमर्जीने अतिशय निकृष्ट असे बंधाऱ्याचे काम करत असून अंदाजपत्रका नुसार काम करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अभियंता यांनी या कामांची चौकशी करून कनिष्ठ अभियंता कवाडे व बंधाऱ्याची निर्मिती करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार शेतकऱ्यांनी १७-६-२०२५ रोजी केली होती परंतु दीड महिना उलटूनही संबंधित विभागाने कोणतीच चौकशी केली नाही त्यामुळे दिनांक 7 ऑगस्ट रोजी तक्रारकर्त्यांनी जलसंधारण विभागाला स्मरणपत्र दिले आहे व चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा जलसंधारण विभागाला दिलेला आहे
0 Comments