Advertisement

शहीद शूरवीर नरवाडे कुटुंबाचा सन्मान — महसूल सप्ताहानिमित्त मोताळा खरेदी-विक्री कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम


शहीद शूरवीर नरवाडे कुटुंबाचा सन्मान — महसूल सप्ताहानिमित्त मोताळा खरेदी-विक्री कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

मोताळा / बुलढाणा | 7 ऑगस्ट 2025


मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी येथील शहीद जवान भीमराव पुंडलिक नरवाडे यांच्या वीर माता रमाबाई नरवाडे आणि वीरपत्नी प्रियंका नरवाडे यांचा सन्मान सत्कार महसूल सप्ताहानिमित्त मोताळा खरेदी-विक्री कार्यालयात करण्यात आला.

या भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन खरेदी-विक्री कार्यालयाचे प्रमुख रजिस्टर सावरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनीही उस्फूर्तपणे आयोजनात सहभाग घेतला. या वेळी वीरमातेचा व वीरपत्नीचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

नेहमी दस्तनोंदणी व खरेदी-विक्री व्यवहारांनी गजबजलेल्या कार्यालयात सात ऑगस्ट रोजी शहीद जवान नरवाडे यांच्या कुटुंबाची आगमन झाले. दस्तनोंदणी प्रक्रियेसाठी आलेल्या कुटुंबाचा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत करून, त्यांच्या कार्याला प्रथम प्राधान्य दिले आणि सन्मानपूर्वक गौरव केला.

कार्यक्रमास शहीद जवान भीमराव नरवाडे यांचे सुपुत्र राजरत्न (६ वर्षे) व कन्या ऋतुजा (९ वर्षे) हेही उपस्थित होते.
तसेच यावेळी लिपिक सागर मोरे, ऑपरेटर अविनाश पवार, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा निकाळजे, आझाद हिंद चे प्रदेश महासचिव संजय येंडोले, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, राम व्यवहारे, भूपेश पाटील, सुशांत पाटील, निलेश ढवचवळे, उल्हास काकर, मनोज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


---

वीर माता व पत्नीच्या डोळ्यांतून अनावर अश्रू — देशप्रेमाची साक्ष

शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान होत असताना, वीर माता रमाबाई नरवाडे आणि वीर पत्नी प्रियंका नरवाडे यांच्या डोळ्यांतून अनावर अश्रू वाहत होते. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीरपुत्राच्या परिवाराचा समाजाने केलेला सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण सर्व उपस्थितांना भावविवश करणारा ठरला.

राजस्थानातील बिकानेर येथे १४ महार बटालियन मध्ये सेवा बजावत असताना शहीद झालेले भीमराव नरवाडे हे आपल्या सेवानिवृत्तीला अवघे सहा महिने उरलेले असतानाच देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या पश्चात दोन चिमुकले अपत्ये आणि संपूर्ण परिवार त्यांच्या बलिदानाचा अभिमान बाळगून देशसेवेसाठी समर्पित राहिला आहे.


---

सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण

हा उपक्रम खरेदी-विक्री कार्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि देशसेवेसाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाविषयी असलेल्या कृतज्ञतेचे मूर्तस्वरूप ठरला आहे.


---

प्रेषक:
खरेदी-विक्री कार्यालय, मोताळा
आझाद हिंद शेतकरी संघटना, बुलढाणा
📅 दिनांक: 7 ऑगस्ट 2025

Post a Comment

0 Comments