Advertisement

बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करा*...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा.

*बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करा*
...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा.
       शिर्ला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त डॉ. रामपाल महाराजांचे समाज प्रबोधन किर्तन उत्साहात.
खामगाव/(संतोष आटोळे)          बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत जयराम महाराज संस्थान राजगडचे धर्मगुरू महंत रायसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील श्री संत जयराम महाराज सांस्कृतिक मंडळ (वाडा) येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. 

जयंतीनिमित्त 11 फेब्रुवारी 2026  रोजी रक्तदान शिबिर पार पडले यामध्ये 15 तरुणांनी रक्तदान केले, गुरुवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज व संदीपपाल महाराज यांचे शिष्य डॉक्टर रामपाल धारकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर किर्तन कार्यक्रम पार पडले. या कीर्तन कार्यक्रमाला खामगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, लाखनवाडा येथील शिवाजीराव पांढरे,सुरेश सुर्यवंशी,विलास पांढरे,विजय खंडारे,विजय रायगांवकर,हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस पाटील भगवान नेमाने, नायक कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी डॉ.रामपाल महाराज यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना अहिंसा, पशु प्रेम, स्त्रियांचा सन्मान, पर्यावरण संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कोणताही जातीभेद न मानता आम्ही सर्व एक परिवार आहोत ही भावना सातत्याने तेवत ठेवा असा विचार आपल्या कीर्तनातून त्यांनी दिला. आजच्या तरुण पिढीने व्यसनापासुन दुर राहुन कोणते कार्य करावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याचा जो मूलमंत्र दिला तो आत्मसात करून घराघरांमध्ये तेवत ठेवण्याचा संदेश देऊन श्री संत सेवालाल महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शिर्ला नेमाने गावातील तरुण युवकांनी थोर समाज सुधारक सप्त खंजेरी वादक डॉक्टर रामपाल महाराज यांचा कीर्तनाचा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला केवळ मनोरंजना पुरते न बघता, ज्या गावात आपण राहतो, त्या गावाची चांगल्या प्रकारे निगा राखली जावी, वसुधैव कुटुंबकमची भावना समाजात अधिक वृध्दीगत व्हावी यासह  बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे असे सांगितले. बंजारा समाजातील युवक युवतींनी चांगले शिक्षण आत्मसात करून दृढ इच्छाशक्ती अंगी बाळगून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे, मतदार संघाचा नागरिक या नात्याने तुमच्या या प्रवासामध्ये माझा सर्व शक्तीनिशी नक्कीच सिंहाचा वाटा असेल अशी ग्वाही सानंदानी दिली आणि श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्त निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार देखील मानले.
यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनीही आपल्या भाषणातून युवा पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून किर्तन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


 यावेळी आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. या किर्तन कार्यक्रमाला बंजारा समाजातील पुरुष-महिला भगिणी,युवक यांच्यासह शिर्ला नेमाने येथील नागरीक व ग्रामस्था मोठया संख्येने उपस्थित होते.संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दि.13 फेबु्रवारी बंजारा भजन पार पडले. 14 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद कार्यक्रमा पार पडला. रविवार दि.15 फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी गावातुन भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments